मिरजेत रिक्षाचालकांत संघर्ष
By admin | Published: June 29, 2015 12:22 AM2015-06-29T00:22:39+5:302015-06-29T00:22:39+5:30
टप्पा वाहतूक : परस्परांवर कारवाईसाठी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन
मिरज : मिरजेत टप्पा वाहतुकीवरून तीन आसनी व पॅगो रिक्षाचालकांत संघर्ष निर्माण झाला आहे. परस्परांवर कारवाईसाठी दोन्ही रिक्षाचालकांच्या संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान करून मिरज-सांगली रस्त्यावर पॅगो रिक्षाची टप्पा वाहतूक सुरू असल्याने रिक्षांवर कारवाईसाठी तीन आसनी रिक्षाचालकांच्या जय भारत रिक्षा संघटनेने आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मिरज शहरात बसस्थानक, रेल्वेस्थानक, मार्केटपासून टप्पा वाहतूक सुरू आहे. मिरज शहरात पॅगो रिक्षासाठी वेगळे थांबे दिलेले नाहीत. तरीही पॅगोचालक मार्केट, रेल्वेस्थानक, बसस्थानक, मिशन हॉस्पिटल या ठिकाणी बेकायदेशीर रिक्षा थांबे निर्माण करून टप्पा वाहतूक करीत असल्याची तीन आसनी चालकांची तक्रार आहे. टप्पा वाहतूक करणाऱ्या पॅगो रिक्षांवर कारवाईच्या मागणीसाठी आठ दिवसात आंदोलन करणार असल्याचे जय भारत संघटनेचे शरीफ काझी, मुबारक कोरबू, समीर सय्यद, इम्तियाज मुल्ला यांनी वाहतूक नियंत्रण शाखेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
महापालिका क्षेत्रात फक्त पॅगो रिक्षाच नव्हे, तर तीन आसनी रिक्षांतून मोठ्याप्रमाणात टप्पा वाहतूक सुरू आहे. कुपवाड, सांगली, मिरज, अंकली, माधवनगर, बुधगाव, हरिपूर या मार्गावर तीन आसनी रिक्षाचालकांकडून टप्पा वाहतूक करण्यात येत आहे. जिल्ह्यात टप्पा वाहतूक करणाऱ्या दोन हजार वाहनांवर कारवाई झाल्यास या सर्वांवर उपासमारीची वेळ येणार आहे. तीन आसनी रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे न घेता जादा भाडे घेऊन प्रवाशांची लुबाडणूक करीत असल्याची पॅगो रिक्षाचालकांची तक्रार आहे. पॅगो व तीन आसनी रिक्षास एकच प्रवासी परवाना असताना, दोन्ही रिक्षांना वेगळे नियम लावता येणार नाहीत.
जिल्ह्यात आठ हजार रिक्षांचा परवाना असताना रिक्षांची संख्या त्यापेक्षा दुप्पट आहे. विनापरवाना रिक्षाचालकांवर कारवाई करावी, पॅगो रिक्षांना थांब्यावर थांबून भाडे करण्यास परवानगी द्यावी, तीन आसनी, पॅगो व इतर सर्व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, पॅगो रिक्षांवर अन्यायी कारवाई करण्यात येऊ नये, असे अॅपे रिक्षा संघटनेचे महेश चौगुले, रफिक जमादार, रियाज आवटी, बंडू तोडकर यांनी निवेदनात म्हटले आहे. (वार्ताहर)