रिक्षा व्यावसायिकांनो शिस्तीचे पालन करा, अन्यथा कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 01:34 PM2019-11-23T13:34:40+5:302019-11-23T13:36:23+5:30
कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिक काही जणांच्या आडमुठ्या धोरणामुळे बदनाम होत आहे. अनेक रिक्षा व्यावसायिक आपली मनमानी करतात. ग्राहकांची पिळवणूक, अरेरावी, इतर वाहनधारकांना दादागिरी, वाहतुकीचे नियम न पाळणे, रस्त्यात कुठेही पार्किंग, रस्त्यावर मध्येच पॅसेंजर घेणे यांसारख्या अनेक गोष्टी रिक्षा व्यावसायिकांसाठी वादग्रस्त ठरत आहेत.
कोल्हापूर : येथील रिक्षाव्यावसायिकांना शिस्त लागावी. त्यांनी वाहन परवाना, परमीट असल्याखेरीज व्यवसाय करू नये. ग्राहकांची लुबाडणूक करू नये. पोलिसांना सहकार्य करावे, अशा सूचना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी रिक्षा व्यावसायिकांना दिल्या. शुक्रवारी वाहतूक नियंत्रण शाखेत बैठकीचे आयोजन केले होते. १२ संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या सर्वांनीच सूचनांचा आदर करीत, रिक्षा व्यावसायिकांच्या भल्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे आश्वासन दिले.
कोल्हापुरातील रिक्षा व्यावसायिक काही जणांच्या आडमुठ्या धोरणामुळे बदनाम होत आहे. अनेक रिक्षा व्यावसायिक आपली मनमानी करतात. ग्राहकांची पिळवणूक, अरेरावी, इतर वाहनधारकांना दादागिरी, वाहतुकीचे नियम न पाळणे, रस्त्यात कुठेही पार्किंग, रस्त्यावर मध्येच पॅसेंजर घेणे यांसारख्या अनेक गोष्टी रिक्षा व्यावसायिकांसाठी वादग्रस्त ठरत आहेत. रात्रीच्या वेळी मनाला येईल ते भाडे आकारने, ग्राहकांशी वाद घालणे आणि मध्यरात्री रस्त्यात सोडणे अशा घटना घडल्याने रिक्षा व्यावसायिकांच्या तक्रारी पोलीस प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
याबाबतचे नियोजन करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी रिक्षा व्यावसायिकांच्या बैठकीचे आयोजन केले होते. सर्वच विषयांवर बैठकीत चर्चा झाली. बैठकीस विश्वास नांगरे, राजू जाधव, चंद्रकांत भोसले, विजय गायकवाड यांच्यासह विविध संघटनांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. सर्वच विषयांवर बैठकीत चर्चा झाली.
१ जानेवारीपासून युनिफॉर्म सक्तीचा
रिक्षा व्यावसायिकांनी एक जानेवारीपासून युनिफॉर्म घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. लायसन्स, बिल्ला सक्ती करण्यात आली आहे. कुठलेही भाडे नाकारायचे नाही, रस्त्यावर स्टॉपखेरीज कुठेही भाडे घ्यायचे नाही, पार्किंग व्यवस्थित करावे, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी असलेल्या भाड्याबद्दल फलक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. रिक्षा व्यावसायिकांनी शिस्तीने राहण्याचे या बैठकीत मान्य केले.
तत्काळ अंमलबजावणी
बैठकीनंतर तत्काळ ठरलेल्या नियमानुसार कारवाईला सुरुवात झाली. रिक्षा व्यावसायिकांना शिस्त लागण्यासाठी शुक्रवारी दिवसभर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर, उपनिरीक्षक शाम देवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रयत्नशील होते. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षा व्यावसायिकांचे नियोजन केल्यामुळे आता त्यांच्यात शिस्त दिसून येत आहे. तसेच ग्राहकांनादेखील या बैठकीनंतर झालेल्या सुधारणांचा फायदा होत आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक शाखेने ठरवलेल्या नियमांंचे उल्लंघन केल्यास रिक्षा व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. या कारवाईमध्ये कुठल्याही नेत्याने तडजोडीसाठी प्रयत्न करू नयेत.
वसंत बाबर : पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा