रिक्षाचालकांचा मोर्चा
By admin | Published: February 17, 2016 01:19 AM2016-02-17T01:19:48+5:302016-02-17T01:20:06+5:30
‘आरटीओ’ कार्यालय : परवाना शुल्कवाढ रद्द करा; कोल्हापुरी हिसका दाखविण्याचा इशारा
कोल्हापूर : रिक्षा परवाना नूतनीकरण शुल्कवाढ विरोधी रिक्षाचालकांनी लढा पुकारला असून, मंगळवारी दुपारी जिल्ह्यातील रिक्षाचालकांनी रिक्षांसह येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर (आरटीओ) विराट मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. राज्य शासनाने ही दरवाढ रद्द करावी, रिक्षाचालकांवर कारवाई केल्यास रिक्षा जाग्यावरच रस्त्यावर थांबवून ‘कोल्हापुरी हिसका’ दाखवू, असा इशाराही यावेळी दिला. रिक्षांनी कार्यालयाला घेराव घातल्याने परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती. परिसरात चालकांनी
जोरदार घोषणाबाजी केली. शिष्टमंडळाच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांना निवेदन देण्यात आले.
राज्य शासनाने रिक्षा परवाना नूतनीकरण शुल्कामध्ये केलेल्या अन्यायी दरवाढ निर्णयाविरुद्धचा लढा तीव्र करण्याचा निर्धार कोल्हापुरातील सर्व रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेतला होता. त्यानुसार मंगळवारी दुपारी येथील सासने मैदानावर कोल्हापूर शहर, इचलकरंजी, जयसिंगपूर, गडहिंग्लज, चंडगड येथील रिक्षाचालक एकत्र आले तेथून रिक्षासह मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा आदित्य कॉर्नरमार्गे प्रादेशिक परिवहन कार्यालयावर पोहोचला तेथे रिक्षाचालकांनी कार्यालयाला घेरावो घालून रस्ता रोको केला. ‘अन्यायी दरवाढ रद्द करा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. आंदोलकांनी शंखध्वनी केला.
रिक्षाचालकांच्या मोर्चाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर अडविला. त्यानंतर हे मुख्य प्रवेशद्वार उघडून सर्व रिक्षाचालक मुख्य इमारतीत घुसले. कार्यालयाच्या मुख्य इमारतीच्या हॉलमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. रिक्षाचालकांनी मागण्यांचे निवेदन देताना, ही दरवाढ रद्द न केल्यास दि. १ मार्चपासून या राज्यभर आंदोलन करण्यात येणार असून त्याची ठिणगी कोल्हापुरात पडल्याचे सांगितले.
एखाद्या रिक्षावर जरी कारवाई केली तर सर्व रिक्षा रस्त्यांवरच थांबविण्याचा व कोल्हापुरी हिसका दाखविण्याचा असा इशारा यावेळी चालकांनी दिला. चर्चेवेळी राजेंद्र वर्मा यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करताना, राज्य शासनाने घेतलेला हा धोरणात्मक निर्णय असल्याने त्याबाबत रिक्षाचालकांच्या भावना शासनास कळवू, असे सांगितले.
या शिष्टमंडळात, महाराष्ट्र रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव, चंद्रकांत भोसले, न्यू करवीर रिक्षा युनियनचे अध्यक्ष सुभाष शेटे, ताराराणी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गौरीशंकर पंडित, चालक-मालक रिक्षा संघटनेचे राजू पाटील, कोल्हापूर जिल्हा रिक्षा व्यवसाय संघटनेचे मोहन बागडी, कॉमन मॅन संघटनेचे अविनाश दिंडे, आदर्श युनियनचे ईश्वर चन्नी, भाजप रिक्षा संघटनेचे विजय गायकवाड, जयसिंगपूर अॅटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष मौला पटेल, सागर सूर्यवंशी तसेच अरुण घोरपडे, दिलीप सूर्यवंशी, अरुण शिंदे, दत्तात्रय जाधव, भास्कर भोसले, विजय जेधे, किशोर कांबळे, प्रशांत रेडे, केशव माने, तसेच विद्यार्थी वाहतूक संघटनेचे शिवाजी पाटील, हिंदुस्थान आॅटो रिक्षा संघटनेचे वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वाहतुकीची कोंडी
या मोर्चामध्ये सुमारे एक हजाराहून अधिक रिक्षा सहभागी झाल्याने मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती, तर कार्यालयाच्या आवारात सुमारे दोन तास रास्ता रोको व घेराव घातल्याने परिसरात वाहतूक ठप्प झाली होती, तसेच ‘आरटीओ’ कार्यालयातील कामकाज कोलमडले होते.