रिक्षा अनुदानाचा लाभ ३ हजार ७५० जणांनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:31 AM2021-06-16T04:31:24+5:302021-06-16T04:31:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जिल्ह्यातील १५ हजार २८७ परवानाधारक रिक्षाचालकांपैकी केवळ ३ हजार ७५० जणांनीच १५०० रुपये ...
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : जिल्ह्यातील १५ हजार २८७ परवानाधारक रिक्षाचालकांपैकी केवळ ३ हजार ७५० जणांनीच १५०० रुपये अनुदानाचा लाभ घेतला आहे. ज्या रिक्षाचालकांनी अद्यापही अर्ज केले नसतील त्यांनी ते त्वरित करावेत, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे. रिक्षाचालकांच्या आधारकार्डमधील त्रुटी हेच ही मदत मिळण्यातील मुख्य अडचण ठरत आहे.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी घातलेल्या निर्बंधांमुळे रिक्षा व्यावसायिकांना मदत व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने रिक्षा परवानाधारकांना दीड हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. हे अर्ज ऑनलाईन भरून सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात असे अर्ज भरण्यासाठी शिबिरेसुद्धा आयोजित करण्यात आलेली होती. पालकमंत्री पाटील हेही मदत मिळावी यासाठी पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करत आहेत.
आजअखेर कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण १५ हजार २८७ रिक्षा परवानाधारकांपैकी फक्त ८ हजार १४० रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. ६ हजार ११७ अर्जांवर कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यापैकी ३ हजार ७४६ रिक्षाचालकांच्या बँक खात्यामध्ये १५०० रुपयांचे अनुदान जमा झाले. ज्यांनी अद्याप या योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या रिक्षाचालकांनी अर्ज करून लाभ घ्यावा. ज्यांचे मोबाईल व बँक खाते आधार लिंक नाही अशा परवानाधारकांनी त्वरित नजीकच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.