रिक्षा चालकाचा मुलगा ठरला युवा पुरस्काराचा मानकरी; महाराष्ट्राच्या पुत्राची अभिमानास्पद भरारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 04:37 PM2019-07-17T16:37:05+5:302019-07-17T17:19:57+5:30
ओंकार नवलिहाळकर या कोल्हापुरातील रिक्षाचालकाच्या मुलाने राष्ट्रीय युवा पुरस्कारावर मोहर उमटवून आईवडीलासह कोल्हापूरची मान अभिमानाने उंचावली आहे. केंद्र सरकारच्या नेहरु युवा केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून दोघांची निवड झाली आहे, त्यापैकी ओंकार यांच्या रुपाने कोल्हापुरला हा पुरस्कार मिळवण्याचा मान प्रथमच मिळाला आहे. येत्या १२ आॅगस्टला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ५0 हजार रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
कोल्हापूर: ओंकार नवलिहाळकर या कोल्हापुरातील रिक्षाचालकाच्या मुलाने राष्ट्रीय युवा पुरस्कारावर मोहर उमटवून आईवडीलासह कोल्हापूरची मान अभिमानाने उंचावली आहे. केंद्र सरकारच्या नेहरु युवा केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून दोघांची निवड झाली आहे, त्यापैकी ओंकार यांच्या रुपाने कोल्हापुरला हा पुरस्कार मिळवण्याचा मान प्रथमच मिळाला आहे. येत्या १२ ऑगस्टला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ५0 हजार रुपये, मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
कळंबा ता. करवीर येथील राहणाऱ्या राजीव आणि स्नेहा नवलिहाळकर यांचा ओंकार हा एकुलता एक मुलगा. वडील रिक्षा चालवतात, संसाराला हातभार म्हणून स्नेहा यांनी अकाउंटण्ट म्हणून काम सुरु केले. लहानग्या ओंकारला पाळणाघरात ठेवून नवरा बायकोने संसार उभारण्यास सुरुवात केली. पण पाळणाघरात खेळता खेळता टाचणी लागल्याचे निमित्त होउन डोळ्याला इजा झाली. डाव्या डोळ्याला अंधत्व आले. हे अपराधीपणाचे ओझे वाहतच ओंकारला वेगळ्या पध्दतीने कुटूंबियांनी वाढवण्यास सुरुवात केली. स्वत: ओंकारने लहानग्या वयातच छोटी मोठी कामे करुन आईवडिलांना आर्थिक हातभार लावला.
नेहरु युवा केंद्रातर्फे दरवर्षी युवकांना प्रेरणादायी काम करणाऱ्यां तरुणांची निवड राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी केली जाते. त्यासाठी १५ सप्टेबर २0१८ रोजी ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यात आले. फेब्रुवारी २0१९ मध्ये त्याची पोलिसांमार्फत चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली. सोमवारी १५ जुलैला पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र केंद्रीय युवक कल्याण व खेल मंत्रालयातर्फे देण्यात आले. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून दोघांची निवड झाली. त्यात कोल्हापुरातून ओंकार नवलिहाळकर आणि नाशिकमधून विनीत मालपुरे यांचा समावेश आहे.
हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. देशातील सर्वात महत्वाचा युवा पुरस्कार मला मिळतो, आणि तो ही राष्ट्रपतींच्या हस्ते याचा मला खूप आनंद झाला आहे. हा पुरस्कार मिळवणे हे प्रत्येक युवकाचे स्वप्न असते, ते मी पूर्ण केले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याचे केंद्र सरकारचे पत्र हातात पडताच आईवडीलांच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिघांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, पण यावेळी त्या दु:खाच्या नव्हे तर आनंदाच्या होत्या.
ओंकार नवलिहाळकर,
पुरस्कार विजेता