टंचाईग्रस्त गावात टॅँकर मंजूरीचे अधिकार आता तहसिलदारांना : चंद्रकांतदादा
By admin | Published: April 24, 2017 07:16 PM2017-04-24T19:16:20+5:302017-04-24T19:16:20+5:30
७४ गावात टंचाई निवारणासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २४ : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात टॅँकर मंजूरीचे अधिकार तहसिलदारांना देण्यात आले आहेत. टॅँकरबाबत खर्चाची माहिती त्यांनी शासनाकडे पाठवायची आहे. याबाबतचा शासननिर्णय काढण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील ७४ टंचाईग्रस्त गावात टंचाई निवारणीसाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्याची माहिती दिली. शासकीय विश्रामगृहातील शाहू सभागृहामध्ये ग्रामीण भागातील संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा व उपाययोजना बाबतची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री उल्हास पाटील, अमल महाडिक, सुजित मिणचेकर, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कायर्कारी अधिकारी इंद्रजित देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उप जिल्हाधिकारी (रोहयो)विजयसिंह देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते. या बैठकीनंतर पालकमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते.
पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यातील ७४ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. यामध्ये आजरा तालुक्यातील ५, भुदरगडमधील १८, चंदगडमधील २३, गडहिंग्लजमधील ४, हातकणंगलेमधील ९, राधानगरीमधील १० आणि शिरोळमधील ५ गावांमध्ये टंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये ९ प्रकारची कामे केली जाणार असून सध्या करावयाच्या २७१ कामांचे नियोजन केले आहे. गावांमधील पाणीसाठयात वाढ करणे, भुजल अधिनियमाची अंमलबजावणी काटेकोरपणे करणे, पाण्याचे मागणी व्यवस्थापन स्थानिकस्तरावर करणे, यामाध्यमातून टंचाई कालावधीत सार्वजनिक विहिर खोल करणे, गाळ काढणे, खाजगी विहरी अधिग्रहण करणे, प्रगतीवरील नळ योजना शिघ्रगतीने पूर्ण करणे, नवीन विंधन विहरी घेणे, विंधन विहरींची दुरुस्ती करणे, नळ पाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्तीकरणे आणि टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करणे आदी उपाय योजना करण्यात येणार आहेत. ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून तात्काळ टँकर चालू करावा, तसेच जी गावे अद्यापही टंचाईग्रस्त घोषित होणे आवश्यक आहेत त्या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी जावून सर्व्हे करावा व तशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. तसेच महानगरपालिका व नगरपालिकांनीही पाण्याचे सुक्ष्म नियोजन करावे, अशा सुचनाही त्यांनी दिला.त्याचबरोबर यामध्ये लोकप्रतिनिधींनीही जागरुकता दाखवून अर्धवेळ नाही तर पूर्ण वेळ काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यात ८४४.४९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध जिल्ह्यात ४ मोठे, ९ मध्यम आणि ५३ लघू असे एकूण ६६ पाटबंधारे प्रकल्प असून त्यामध्ये मोठ्या प्रकल्पांमध्ये ५५८.१०, मध्यम प्रकल्पांमध्ये १९५.८६ तर लघू प्रकल्पांमध्ये ६०.५३ असा एकूण ८४४.४९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. असे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यात टंचाई आराखड्यामध्ये १०० गावांचा समावेश असून १७१ वाडया आहेत. टंचाईग्रस्त सुमारे १८०९३६ लोकसंख्येसाठी २ कोटी रुपये खर्चाची २७२ कामे हाती घेण्यात आली आहेत. आॅक्टोबर २०१६ ते जून २०१७ अखेर आजरा तालुक्यातील ७ गावे व १६ वाड्या, भुदरगडमधील १६ गावे व ३६ वाडया, चंदगडमधील १३ गावे व ११ वाडया, गडहिंग्लजमधील २६ गावे आणि ७ वाडया, गगनबावड्यातील ३ वाडया, हांतकणंगलेतील ९गावे १५ वाडया, करवीरमधील २ गावे व १ वाडी, कागलमधील १ गाव १६ वाडया, पन्हाळयातील ११ गावे आणि १० वाडया, राधानगरीतील ६ गावे आणि ३१ वाडया, शाहूवाडीतील ५ गावे व ११ वाडया, शिरोळमधील ४ गावे १४ वाड्यांचा समावेश आहे.