वारणेचे हक्काचे पाणी मिळविणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 12:24 AM2018-05-15T00:24:56+5:302018-05-15T00:24:56+5:30
इचलकरंजी : फसवेगिरी करणाऱ्या पुढाºयांच्या नादाला लागून वारणाकाठच्या नागरिकांनी पाण्याला नाही म्हणण्याचे पाप करू नये. त्यांचा नाद सोडून इचलकरंजीला पाणी देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करीत इचलकरंजीसाठी वारणा नदीतून हक्काचे पाणी मिळविणारच. त्यासाठी पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. साशमवारचा मोर्चा हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर अभी बाकी है, असा इशाराही आमदार सुरेश हाळवणकर यांनी दिला.
शासनाच्या अमृत योजनेंतर्गत वारणा नदीतून पाणी आणण्यासाठी वारणाकाठावरील नागरिकांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी इचलकरंजीतील सर्वपक्षीय नेत,े तसेच नागरिकांनी प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. त्यावेळी ते बोलत होते. पाण्यासाठी मोर्चामध्ये हजारो नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्यावतीने प्रांताधिकारी समीर शिंगटे यांना निवेदन देण्यात आले.
सुरुवातीला काविळीच्या साथीमध्ये बळी ठरलेल्या ४० नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
मोर्चासमोर बोलताना हाळवणकर म्हणाले, एखादा पुढारी उठतोय आणि पाणी नाही म्हणण्याचं पाप करतोय. चार लाख लोकसंख्या असलेल्या शहराला पाणी नाही म्हणणाºयांचा नायनाट होईल. गावकºयांनी त्यांचा नाद सोडावा आणि आम्हाला पाणी द्यावे. इचलकरंजीकरांच्या शांततेला नामुष्की समजू नये. प्रसंग पडल्यास कुदळ-फावडे आणि मागाचा लाकडी मारा घेऊन वारणा योजनेच्या भूमिपूजनाला दानोळीत आल्याशिवाय राहणार नाही. तरी आमचा अंत पाहू नका.
नगराध्यक्षा अलका स्वामी म्हणाल्या, इचलकरंजीवासीयांना पाणी-पाणी करायला लावू नका. वारणा नदीतील पिण्यासाठी म्हणून आरक्षित असलेल्या पाण्यातील हक्काचे पाणी आम्ही मागत आहोत आणि ते मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही. पंचगंगा व कृष्णा नदी प्रदूषित झाली असल्याने इचलकरंजी शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड आम्हाला परवडणारी नाही. दूषित पाण्यामुळे सुमारे चाळीस हजार नागरिकांना काविळीची लागण झाली. त्यामध्ये चाळीस नागरिक मृत्युमुखी पडले. या सर्वांचा गांभीर्याने विचार करूनच शासनाने योजना मंजूर केली आहे. त्यामुळे हक्काचे पाणी आम्ही मिळविणारच.
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, वारणेच्या पाण्यावर आमचा हक्क आहे. तो हक्क कसा बनतो, याबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. पाण्यासाठी आमची नेहमी संयमाची भूमिका आहे. गरज पडल्यास संघर्षाची तयारीही आहे. कृष्णा नदीतून पाणी आणताना विरोध होता, तो झुगारून योजना राबविली. आता तर राजकारण विसरून एकत्र आलो आहोत. त्यामुळे वारणेतील पाणी आणणारच, असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी मदन कारंडे, दत्ता माने, पाणीपुरवठा सभापती नितीन जांभळे, अजित जाधव, आदींची भाषणे झाली. सर्वच वक्त्यांनी वारणा नदीतून पाणी मिळालेच पाहिजे, असा निर्धार व्यक्त केला. उपनगराध्यक्षा सरिता आवळे यांनी मोर्चात सहभागी झालेल्या शहरवासीयांचे आभार मानले.