ज्येष्ठांच्या हक्कांसाठी लढणारी केंद्रे व्हावीत...

By admin | Published: October 1, 2015 12:09 AM2015-10-01T00:09:04+5:302015-10-01T00:44:36+5:30

नुसतीच विरंगुळ्याची केंद्रे नकोत : सुनीलकुमार लवटे

For the rights of the senior citizens ... | ज्येष्ठांच्या हक्कांसाठी लढणारी केंद्रे व्हावीत...

ज्येष्ठांच्या हक्कांसाठी लढणारी केंद्रे व्हावीत...

Next

रोज संध्याकाळी ठरावीक ठिकाणी भेटून एकमेकांचे वाढदिवस, मनोरंजन करणे किंवा मग गप्पांत वेळ घालविणे, अशी सर्वसाधारणपणे वृद्धांची दिनचर्या असते. त्यापलीकडे जाऊन सक्षम ज्येष्ठांनी कौटुंबिक आणि सामाजिक पातळ्यांवर विशेषत: असंघटित क्षेत्रातील ज्येष्ठांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत व्यक्त केले आहे प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी. ‘ज्येष्ठ नागरिक दिना’निमित्त त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...

प्रश्न : देशात ज्येष्ठ नागरिकांची स्थिती कशी आहे?
उत्तर : भारतात संघटित आणि असंघटित क्षेत्रांतील अशा दोन प्रकारांत वृद्धांचे वर्गीकरण करता येईल. संघटित म्हणजे नोकरदार किंवा सेवानिवृत्त झालेले, ज्यांना पेन्शनसारखी सुविधा किंवा कुटुंबात आर्थिक सुबत्ता आहे असे वृद्ध. असंघटित म्हणजे शेतकरी, शेतमजूर, कामगार, तसेच ज्यांना रोज भाकरीसाठी लढावे लागते, असे ज्येष्ठ नागरिक. भारतात १२५ कोटी लोकसंख्येपैकी साधारण १० टक्के लोकसंख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे. ज्यात असंघटित क्षेत्रातील किंवा ज्यांना जगण्याची लढाई द्यावी लागते, अशा ज्येष्ठांची संख्या खूप जास्त आहे.
प्रश्न : ज्येष्ठांचे प्रश्न कोणते?
उत्तर : ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न मोठ्या शहरातील उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय आणि दारिद्र्यरेषेखालील अशा तीन स्तरांवर आहेत. मुंबई, पुणे, बंगलोर, चेन्नईसारख्या मेट्रो सिटीमधील मुलं-मुली उच्च शिक्षण घेऊन परदेशात स्थायिक असतात. आई-वडील भारतात. आर्थिक सुबत्ता आहे; पण कुटुंबात प्रेमाने बोलायला माणसं नाहीत. मध्यमवर्गीयांमध्ये कुटुंबात आर्थिक सुबत्ता आहे; पण मुलगा-सून दोघेही नोकरी करणारे किंवा विभक्त कुटुंब; त्यामुळे एकटेपणा, आपले कुणी नाही, अशी सततची टोचणी. तिसऱ्या प्रकारात मुख्यत: दारिद्र्यरेषेखालील आणि ग्रामीण भागातील ज्येष्ठ येतात, ज्यांचे जगणेच फारसे विचारात घेतले जात नाही. आता लग्न जुळवितानाच मुलगी लग्नानंतर वेगळे राहण्याची अट घालते. ‘कुटुंबात ज्येष्ठांचा आदर’ हा संस्कारच आता लोप पावत चालला आहे. त्यात टी.व्ही.वरील मालिकांची भरच पडते. ज्येष्ठही काही अंशी हेकेखोर, अहंकारी आणि काहीवेळा कुटुंबात कलहाला कारणीभूत ठरतात, हीदेखील दुसरी बाजू आहे.
प्रश्न : शासकीय योजनांचा ज्येष्ठांना किती लाभ होतो?
उत्तर : जपान, आॅस्ट्रेलिया, सिंगापूरसारख्या अनेक देशांमध्ये ज्येष्ठांसाठी तेथील सरकारने निवासी संकुलापासून ते प्रवासापर्यंत इतक्या सोयीसुविधा दिल्या आहेत की, त्यांना या वयात प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागत नाही. भारतात नेमकी उलटी स्थिती आहे. येथे ज्येष्ठांना अजिबात मानसन्मान दिला जात नाही. शासनाने २०१३ साली ‘ज्येष्ठ नागरिक धोरण’ जाहीर केले; पण गेल्या दोन वर्षांत त्याची अंमलबजावणीच झाली नसल्याचे चित्र आहे. ज्येष्ठांसाठी शासनाच्या काही योजना आहेत; पण त्या कल्याणकारी नव्हे, तर सवलतीच्या आहेत. म्हणजे ठेवीच्या व्याजदरात अर्धा टक्का वाढ, एस.टी., रेल्वे प्रवासात सूट, आरक्षित जागा अशा प्रत्येक गोष्टीत काहीतरी सूट आहे, ज्या ‘आहे रे’ वर्गासाठीच्याच आहेत. पण अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि सुरक्षा या पाच गरजा पूर्ण करणाऱ्या कल्याणकारी योजना आजही राबविल्या जात नाहीत.
प्रश्न : ज्येष्ठांच्या संघटना कितपत उपयुक्त आहेत?
उत्तर : कोल्हापूरसह देशात ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक संघटना आहेत; पण त्यांचे स्वरूप केवळ विरंगुळ्याचेच आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी बागेत, मंदिराच्या कट्ट्यावर अशा ठरावीक ठिकाणी भेटायचे. वाढदिवस, गेट टुगेदरसारखे कार्यक्रम किंवा गप्पाटप्पांमध्ये वेळ घालवायचा, एवढ्यावरच ते मर्यादित आहेत. हा वर्गही आर्थिक स्थिरता आणि शारीरिकदृष्ट्या परावलंबी नसलेला असा आहे. त्यामुळे त्यांनी या विरंगुळ्यापलीकडे जाऊन असंघटित क्षेत्रातील किंवा दारिद्र्यरेषेखालील ज्येष्ठांसाठी काम करायला हवे. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध शासकीय योजना,
हक्कांसाठी लढा दिला पाहिजे. कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारायला हव्यात, मुला-मुलींना मदत केली पाहिजेच; पण सामाजिक
क्षेत्रातही योगदान देण्यासाठी पुढे आले पाहिजे.
प्रश्न : ज्येष्ठांचे जगणे सुखकर होण्यासाठी काय करता येईल?
उत्तर : ज्येष्ठांना आरोग्याच्या सुविधा मोफत किंवा अत्यल्प दरात, रुग्णालयांमध्ये स्वतंत्र वॉर्ड, शासनाच्या आरोग्यदायी योजनांचा लाभ, त्यांच्या निवाऱ्याची सोय, संस्कारक्षम पाल्य तयार व्हावेत, यासाठी शालेय अभ्यासक्रमात, मूल्यशिक्षणात आदरभाव, सहकार्य यांचा समावेश, हेल्पलाईनची सोय, शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या कामांना प्राधान्य, अशा अनेक गोष्टी करता येतील. देशातील सरकार ज्याप्रमाणे पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करते, त्याचप्रमाणे ज्येष्ठांच्या विकास आणि कल्याणाकडेही समांतर लक्ष द्यायला हवे.
- इंदुमती गणेश

Web Title: For the rights of the senior citizens ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.