विठ्ठलनामाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

By admin | Published: July 5, 2017 12:52 AM2017-07-05T00:52:26+5:302017-07-05T00:52:26+5:30

लाखोंच्या उपस्थितीत कोल्हापूर-नंदवाळ दिंडी : विणेकरी, टाळकरी अन् बनले मंगलमय वातावरण

Ringtones in color of VitthalName | विठ्ठलनामाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

विठ्ठलनामाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : हाती भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, मुखी विठ्ठलाचे नाम, मध्यभागी माउलींची चांदीची पालखी आणि भोवतीने फिरणारे अश्व, मधूनमधून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अशा मंगलमय वातावरणात मंगळवारी नंदवाळ दिंडीतील रिंगण सोहळा पार पडला.
कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथील विठ्ठल मंदिरातून सकाळी कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पायी दिंडी सोहळ्याला सुरुवात झाली. यंदा प्रथमच या दिंडी सोहळ्यात चांदीची पालखी होती. रथात चांदीची पालखी आणि त्यात ज्ञानेश्वर माउलींची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. सकाळी साडेनऊ वाजता उद्योगपती अभय देशपांडे, आनंदराव लाड महाराज, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ, विठ्ठल दराडे, दीपक गौड, बाळासाहेब पोवार यांच्या हस्ते पालखीपूजन झाल्यानंतर वारकरी नंदवाळच्या दिशेने निघाले.
विणेकरी, टाळकरी, मानाचे अश्व, मानदंड धरणारे मानकरी आणि विठ्ठलनामाचा गजर करणारे वारकरी अशी पायी दिंडी सुरू झाली. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने भजन, कीर्तन करीत दिंडी बिनखांबी गणेश मंदिर येथून मार्गस्थ झाली.
ही दिंडी निवृत्ती चौक, उभा मारुती चौक, खंडोबा तालीम, जुना वाशी नाका, सानेगुरुजी वसाहतीमार्गे पुईखडी येथील संकल्पसिद्धी मंगल कार्यालयासमोरील मोकळ्या पटांगणात आली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दिंडीतील महत्त्वाचा मोठा रिंगण सोहळा झाला. येथे महापौर हसिना फरास, उपमहापौर अर्जुन माने, आर. आर. पाटील, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत, नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीत पालखीचे पूजन झाले.
यावेळी प्रथम पताका, टाळ, मृदंग, विणेकरी आणि अखेरीस अश्व असे रिंंगण झाले. माउली आणि संग्राम या अश्वांनी केलेला रिंंगण सोहळा भाविकांनी ‘याचि देही, याची डोळा’ अनुभवला. अश्व धावलेल्या या मार्गावरील माती कपाळाला लावण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली. यानंतर पालखीचे नंदवाळसाठी प्रस्थान झाले.


चांदीची देणगी
भाविकांच्या देणगीतून मिळालेल्या तब्बल अकरा किलो चांदीपासून माउलींची पालखी घडविण्यात आली आहे. मात्र, पालखीच्या दांड्यासह अन्य साहित्यासाठी आणखी दोन किलो चांदीची आवश्यकता आहे. तरी भाविकांनी यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत कुर्डू गावचे सरपंच संदीप पाटील यांच्याकडून एक किलो, राहुल पाटील युवा मंचकडून एक किलो आणि पीरवाडीचे पांडुरंग मिठारी यांच्याकडून अर्धा किलो चांदी जाहीर करण्यात आली.


तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग
पायी दिंडी म्हणजे मध्यमवयीन किंवा वयस्कर व्यक्तींचा तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा सहभाग असा एक समज आहे. मात्र नंदवाळ दिंडीत यंदा तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. महाविद्यालयीन युवक-युवती हातात टाळ घेऊन आणि विठ्ठलनामाचा गजर करीत चालत होते.
पुईखडी टेकडीवर हातातील भगवी पताका नाचवीत आणि भक्तीत दंग झाले. छायाचित्रणाचा छंद असलेली तरुणाई हातात कॅमेरे घेऊन हा सोहळा व क्षणचित्रे टिपण्यासाठी उपस्थित होती. महालक्ष्मी होंडाचे गौरव दिंडे यांनी विठ्ठलाची वेशभूषा केली होती. तसेच लहान मुले-मुली विठ्ठल-रखुमाईचा वेश धारण करून दिंडीत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचाही आनंद अनेकांनी लुटला.


फराळ वाटप आणि आरोग्य सेवा
वारकऱ्यांच्या सोयीसाठी वाटेत शहरातील विविध मंडळे, तालीम संस्था व नागरिकांच्या वतीने वारकऱ्यांना खिचडी, राजगिरा लाडू, शाबू वडे, केळी, चिक्की, चहा, दूध अशा फराळाचे वाटप केले जात होते. आनंदराव ठोंबरे, साहेबराव काशीद, सुदर्शन मित्रमंडळ, निवृत्ती चौक रिक्षा मंडळ, श्रीराम एजन्सी अशा संस्थांनी यात योगदान दिले. पुईखडी येथे ‘गोकुळ’तर्फे दुधाचे वाटप करण्यात आले. शासनाच्या रुग्णवाहिकेच्या सेवेसह, मंडलिक साखर कारखाना, सिद्धगिरी मठ यांच्या वतीनेही रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली होती. याद्वारे नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात आली.

Web Title: Ringtones in color of VitthalName

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.