रंकाळ्याच्या मरणकळा ‘स्थायी’पर्यंत पोहोचल्याच नाहीत
By admin | Published: May 24, 2014 12:59 AM2014-05-24T00:59:22+5:302014-05-24T01:02:19+5:30
कोल्हापूर : शहराचे वैभव असलेला रंकाळा अखेरची घटका मोजत आहे. संरक्षक तटबंदी कोसळून रंकाळ्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
कोल्हापूर : शहराचे वैभव असलेला रंकाळा अखेरची घटका मोजत आहे. संरक्षक तटबंदी कोसळून रंकाळ्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. तटबंदीसाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार आहे. लाखावर निधी उपलब्ध करून देऊ, तातडीने दुरुस्ती करु, अशी पोकळ आश्वासने देण्यात पदाधिकारी दंग आहेत तर दुसरीकडे पैशांअभावी काम रखडल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. कोल्हापूरच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आज (शुक्रवारी) महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज गांभीर्याने चर्चा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, एकाही सदस्यांने याबाबत ‘ब्र’ही काढला नाही. यावरूनच रंकाळ्याविषयी असलेली पदाधिकार्यांची आस्था किती बेगडी आहे व त्यांच्या घोषणा या ‘बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात’ असल्याचे चित्र स्पष्ट झाले. चार महिन्यांपूर्वी कोसळलेल्या रंकाळा तलावाच्या पश्चिमेकडील बाजूची कोसळलेल्या तटबंदी दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यातच पंधरा दिवसांपूर्वी तटबंदीचा आणखी एक मोठा भाग कोसळला तर चार दिवसांपूर्वी उद्यानाकडील बाजूची तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळली. याबाबत ठोस उपाययोजना न राबविल्यास उद्यानाकडील तटबंदीचा मोठा भाग पाण्यात कोसळण्याची शक्यता आहे. महानगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा फटका रंकाळा तलावास बसत आहे. शालिनी पॅलेससमोरील रंकाळा उद्यान परिसरात तलावाच्या आतील बाजूच्या तटबंदीमधील दोन दगडांना सांधून ठेवणार्या सिमेंटचा दर्जा खराब झाल्याने तटबंदीचे दगड कोसळत आहे. नारळाच्या झाडांच्या मुळामुळे तटबंदी धोका पोहोचत असल्याचा निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. मात्र, झाडे न तोडताही तटबंदी सुरक्षित करता येऊ शकते. मात्र, चर्चेपलीकडे महापालिकेत ठोस कारवाईसाठी काहीही होताना दिसत नाही. शालिनी पॅलेससमोरील संपूर्ण तटबंदी वेडी-वाकडी झाली आहे. कोणत्याही क्षणी ही तटबंदी कोसळू शकते इतकी जमीन भुसभुशीत झाली आहे. दगड एकमेकांपासून सुटत आहेत. सुदैवाने तटबंदी कोसळल्याने पर्यटकांच्या जीवितहानी झालेली नाही. मात्र, महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे पर्यटकांच्या जिवालाही धोका निर्माण झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी तलावाच्या तटबंदीचा एक भाग कोसळला होता. त्या कोसळलेल्या भागात सिमेंट कॉँक्रिटच्या साहाय्याने बिम टाकून तटबंदीच्या वरील भागाला आधार दिला आहे. परंतु पाण्याकडील भाग अद्याप दुरूस्त करण्यात आलेला नाही. हे काम पैसे नसल्याने अत्यंत कासवगतीने सुरू आहे. या कोसळलेल्या तटबंदीचे काम अपूर्ण असतानाच त्याच कोसळलेल्या भागापासून पन्नास फुटांवरील काही भाग पुन्हा कोसळला. त्यामुळे ही संपूर्ण तटबंदीच धोकादायक बनली आहे. रंकाळ्यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी स्थायी समितीमध्ये ठोस तरतूद होईल, अशी रंकाळाप्रेमींना आशा होती, मात्र, चकार शब्दही बैठकीत सदस्यांनी काढला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)