शासन विरुद्ध शेतकऱ्यांची दंगल

By admin | Published: April 17, 2017 01:08 AM2017-04-17T01:08:56+5:302017-04-17T01:08:56+5:30

बच्चू कडू : शिरोळ येथे सीएम टू पीएम आसूड यात्रा; सरकार बदलले, पण परिस्थिती नाही

The riot of the farmers against the government | शासन विरुद्ध शेतकऱ्यांची दंगल

शासन विरुद्ध शेतकऱ्यांची दंगल

Next



शिरोळ : गेल्या साठ वर्षांत शेतकऱ्यांच्या व्यथा कायम आहेत. जात आणि पात लोकांनी डोक्यातून काढून पंढरपूरच्या वारीला जाणारे लोक जर मुंबईला गेले तर सत्ताधारी, सरकार हडबडेल. साडेतीन लाखांवर आत्महत्या झाल्या, सरकार बदलून पाहिलं, मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत बजेट बदलले नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शासन दखल घेत नसेल तर यापुढे शासन व शेतकऱ्यांची दंगल पाहायला मिळेल, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी शिरोळ येथे दिला.
शिरोळ येथे शनिवारी शेतकरी आसूड यात्रा सी.एम. टू पी.एम.च्या दरम्यान आयोजित सभेत आमदार कडू बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक शिरोळचे आमदार उल्हास पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील होते.
आमदार कडू म्हणाले, प्रामाणिकपणे काम केले तर हा लढा यशस्वी होणार आहे. या लढ्यात खासदार राजू शेट्टी जरी सोबत आले तरी त्यांचे स्वागत आहे. मात्र, त्यांनी आमच्यासोबत प्रामाणिकपणे राहिले पाहिजे. २१ एप्रिलला गुजरात येथील वडनगर येथे शेतकरी आसूड यात्रेचा समारोप येईल. पंतप्रधानांना शेतकऱ्यांची शक्ती दाखवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून तसेच शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बच्चू कडू यांनी केले.
यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे हित पाहणारे कोणतेच सरकार नाही. आताचे सरकारही आपलं नाही. यामुळे वडनगर येथे होणाऱ्या आसूड मोर्चासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शेतकरी गेला पाहिजे. या दोन जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची उपस्थिती निश्चितच बळ देणारी ठरणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, बळिराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, कांतिदास अपटे, दिलीप माणगावे, विकास पाटील, कमरुद्दीन पटेल, मंगेश देशमुख, धनाजीराव जगदाळे, मिश्रीलाल जाजू यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The riot of the farmers against the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.