विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक ध्रुवीकरणासाठी गजापुरातील दंगल; इतिहास संशोधक सावंत यांचा गंभीर आरोप

By भीमगोंड देसाई | Published: July 22, 2024 02:12 PM2024-07-22T14:12:12+5:302024-07-22T14:12:23+5:30

राजकीय हेतूने प्रेरित होऊन कृत्य, अभ्यास करून नियोजन

Riots in Gajapur for Religious Polarization Ahead of Assembly Elections, A serious allegation of history researcher Indrajit Sawant | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक ध्रुवीकरणासाठी गजापुरातील दंगल; इतिहास संशोधक सावंत यांचा गंभीर आरोप

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक ध्रुवीकरणासाठी गजापुरातील दंगल; इतिहास संशोधक सावंत यांचा गंभीर आरोप

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची मोहीम असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक ध्रुवीकरणासाठी गजापुरातील मुसलमानवाडीतील दंगल, हिंसाचार केला आहे, असा गंभीर आरोप इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला. दंगल करणारे शिवभक्त नव्हेत, तर प्रशिक्षित दंगलखोर होते. त्यांना कोणीतरी मार्गदर्शक असेल. त्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बेदरकार, निर्घृणपणे तोडफोड केली. धार्मिक स्थळांवर हल्ला चढवला. त्यांनी पोलिसांसमोरच हातात तलवारी, चाकू घेऊन प्रचंड दहशत माजवून लहान मुले, महिलांना जंगलात पळवून लावले. यामुळे पोलिस आता खऱ्या दंगलखोरांना पकडणार का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विषयात झालेल्या हिंसाचारानंतर राज्यभर विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. यामुळे गडप्रेमी, इतिहास अभ्यासक सावंत यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. त्यावेळी ते अतिशय निर्भीडपणे आपली मते मांडली. निरीक्षण नोंदवले. विशाळगडावरील अतिक्रमण निघालेच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रश्न : विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा विषय अचानक आला का ?
सावंत
: माझ्यासारखे अनेक शिवप्रेमी गेल्या २० ते २५ वर्षांपासून विशाळगडावरील अतिक्रमण काढा, अशी मागणी प्रशासनाकडे करीत होते. दोन वर्षांपूर्वी संभाजी छत्रपती आणि गडप्रेमींनी विशाळगडाला भेट देऊन आल्यानंतर अतिक्रमण काढण्यासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. अतिक्रमणे निश्चित केली. ती काढण्यासाठी निविदा निघाली. अचानक हा विषय थांबला. हिंदू, मुस्लिम समाजांतील काही लोक न्यायालयात गेले. प्रशासन हा विषय न्यायालयात आहे, असे सांगत राहिले. दरम्यान, अचानकपणे कोणाला तरी वाटले म्हणून अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली. गडावरील आणि पायथ्याचे अतिक्रमण काढण्याऐवजी अतिक्रमण नसलेले, नियमांनुसार बांधलेल्या मुसलमानवाडीतील घरांना टार्गेट करून त्यांच्यावर हल्ला केला. तोडफोड केली. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राजकीय हेतूने हे टाइमिंग साधले आहे.

प्रश्न : प्रशासन, पोलिस गाफील राहिले का ?
सावंत
: विशाळगड अतिक्रमण मोहीम होणार असल्याचे जाहीरपणे माध्यमातून आधी आले होते. संभाजीराजे तर वाजत-गाजत, हलगी, घुमक्याच्या गजरात गडावर गेले. हे सर्व पोलिस पाहात होते. तरीही त्यांनी पुरेशा प्रमाणात खबरदारी घेतली नाही. संभाजीराजे छत्रपती यांनीही मोहिमेत अपप्रवृत्ती घुसू नये, म्हणून विशेष काळजी घेतली नसल्याचे दिसते. अतिक्रमण काढण्यासाठी कोणाचाही विरोध नव्हता. मात्र, दंगलखोरांनी मोकाटपणे मुसलमानवाडीत हिंसाचार केला. प्रचंड नासधूस केली. पोलिसांना अजून खरे दंगलखोर सापडलेले नाहीत. काही संबंध नसताना अटक झालेल्या शिवभक्तांच्या पाठीशी आता नेतृत्वही राहिलेले नाही, ही खरी शोकांतिका आहे.

प्रश्न : विशाळगडावरील अतिक्रमणास जबाबदार कोण ?
सावंत
: विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणास राज्य पुरातत्त्व विभाग, सांस्कृतिक मंत्री, तहसीलदार, प्रांताधिकारी, तर पायथ्याशी झालेल्या अतिक्रमणास वनविभाग जबाबदार आहे. यांनी वेळोवेळी प्रत्यक्ष अतिक्रमण होताना बघ्याची भूमिका घेतली. परिणामी गडाचे पावित्र्य नष्ट झाले आहे. तिथे कोंबड्या, बकरी कापून अनावश्यक भाग उघड्यावर टाकला जात आहे. कोणत्याही प्रकारची स्वच्छता नाही. म्हणून तिथे जाणारा शिवप्रेमी विषण्ण होतो. केवळ विशाळगडासह पन्हाळगड, प्रतापगड अशा सर्वच गडावर अतिक्रमण आहे. राजकारणासाठी आणि मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी केवळ विशाळगडावरचेच नव्हे तर सर्वच गडांवरील अतिक्रमण निघाले पाहिजे.

संचारबंदीचा फटका ट्रेकरनाही

पन्हाळा ते विशाळगड, पावनखिंड असा ट्रेक या हंगामात जगभरातील शिवप्रेमी, निसर्ग अभ्यासक करतात. दंगलीमुळे पोलिसांनी संचारबंदी केली आहे. ट्रेकरना ट्रेकिंग करता येत नाही. त्यांनाही दंगलीचा फटका बसला आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

Web Title: Riots in Gajapur for Religious Polarization Ahead of Assembly Elections, A serious allegation of history researcher Indrajit Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.