पोलिसांचा थंडावला दंडा, भाईगिरीचा नवा फंडा; ‘हाफ मर्डर’ करायचा, चार दिवस कारागृहात काढायचे अन्..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 12:02 PM2022-02-07T12:02:42+5:302022-02-07T12:17:11+5:30

शहर व परिसरात सध्या किरकोळ वादातून जीवघेणे हल्ले, मारामारी

Rising crime in Kolhapur district | पोलिसांचा थंडावला दंडा, भाईगिरीचा नवा फंडा; ‘हाफ मर्डर’ करायचा, चार दिवस कारागृहात काढायचे अन्..

पोलिसांचा थंडावला दंडा, भाईगिरीचा नवा फंडा; ‘हाफ मर्डर’ करायचा, चार दिवस कारागृहात काढायचे अन्..

Next

तानाजी पोवार

कोल्हापूर : विना कष्ट अमाप पैसा मिळविण्यासाठी कुणाचा तरी ‘हाफ मर्डर’ करायचा, चार दिवस कारागृहात काढायचे अन् बाहेर येऊन गळ्यात पिवळ्या धमक साखळ्या अडकून भाईगिरी गाजवायची. मग पुढे खंडणी, फाळकूटदादा, वाटमारी, कुळे काढणे, मटक्यांचे अड्डे, पत्त्यांचे क्लब चालविण्याचे त्यांना जणू लायसन्सच मिळते.

बेकायदेशीर धंद्यातून बक्कळ पैसा मिळवायचा. त्यातूनच भागावर आपले वर्चस्व ठेवण्यासाठी प्रतिस्पर्धी गॅंगशी दोन हात करायचे. ओठावर मिसरुड फुटण्यापूर्वीच कोवळी पोरं हातात नंग्या तलवारी घेऊन गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश करू लागली आहेत.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत ‘मोक्का’ कारवाईत मोठ्या संख्येने गुंडांना कारागृहात बसावे लागले; पण त्यामुळे दुसऱ्या स्थानावरील गुंडांचे फावले असून ते आज या टोळींच्या प्रमुखांच्या जागा घेण्यासाठी मोठमोठे गुन्हे करताना दिसत आहेत.

शहर व परिसरात सध्या किरकोळ वादातून जीवघेणे हल्ले, मारामारी होतात. या गुंडांकडून राजरोसपणे नंग्या तलवारी घेऊन भागात दहशत माजवली जात आहे. किरकोळ वाद झाला तरीही तलवारी, कुकरी, एडका, गुप्ती, आदी प्राणघातक हत्यारे सपासप बाहेर पडतात. या गुंडांना खरंच पोलिसांचे भय नाही का? असा प्रश्न समाजासमोर उभारला आहे.

वारे वसाहत, सुधाकर जोशी नगर, राजेंद्रनगरात होणारे प्रकार हे त्याचाच एक भाग आहे. शनिवारी वारे वसाहतीतील घडलेला प्रकार हा सर्वसामान्यांच्या अंगावर थरकाप उडविणारा आहे. कोल्हापुरात सध्या जुना राजवाडासह शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरीसह करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी टोळ्यांचे प्रस्त वाढतच चालले आहे.

बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू

- ‘बेकायदेशीर व्यवसाय बंद आहेत’ असे मोठ्या दिमाखात सांगणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सध्या मटका, जुगार क्लब, दारू तस्करी, गावठी हातभट्ट्या, आदी राजरोसपणे बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत.

- या गुंडांकडूनच हे व्यवसाय चालविले जात आहेत. पोलीस ठाण्यातील डीबी पथकांशी त्यांचे असणारे लागेबांधे यामुळे सर्वसामान्य माणूस तक्रारीसाठी पुढे येत नाही.

कारागृहातून सुटताच जंगी मिरवणुका

गुन्हे करायचे, कारागृहात काही दिवस बसायचे. जामीन झाला की वाजत-गाजत मिरवणूक काढायची. गुंडगिरीचे वजन वाढविण्यासाठी अलीकडे ही क्रेझच झाली आहे. त्यातूनच गुन्हेगारी फोफावू लागली आहे.

वारे वसाहतीत झाला जंगी वाढदिवस

- वारे वसाहतीतील राड्यापूर्वी दोन दिवस अगोदरच तेथेच एकाचा जंगी वाढदिवस झाला.

- हजारभर जणांनी तांबड्या-पांढऱ्यावर ताव मारला. तेथेच खरी वादाची ठिणगी पडली.

पोलिसांना हे माहीत असूनही त्याकडे कानाडोळा केला. त्याचेच पडसाद हाणामारीवर उमटले; पण दोन्हीही गटांकडे मारामारीचे खरे कारण समोर आणण्याचे धैर्यच नव्हते.

- पाच वर्षात ‘मोक्का’ कारवाई : ४८ टोळ्या, ३०२ गुंड अटक

- २०२१ मध्ये कारवाई : जुगार - १०१०, दारूबंदी -२६०३

- गर्दी, मारामारीच्या घटना : ३९१ गुन्हे

- बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर कारवाई : १३ गुन्हे (११ रिव्हॉल्व्हर, ६ रायफल)

Web Title: Rising crime in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.