सरुड गावात कोरोनाच्या समूह संसर्गाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:21 AM2021-04-26T04:21:57+5:302021-04-26T04:21:57+5:30
सरुड गावातील वाढती कोरोना बाधित रुग्णसंख्या पाहता गावात समूह संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. १ एप्रिलपासून शनिवारअखेर २९ ...
सरुड गावातील वाढती कोरोना बाधित रुग्णसंख्या पाहता गावात समूह संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. १ एप्रिलपासून शनिवारअखेर २९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून यातील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. सध्या शाहूवाडी तालुक्यातील सर्वात जास्त रुग्णसंख्या सरुड येथे असून नागरिकांची बेफिकिरी येथील वाढत्या रुग्णसंख्येला कारणीभूत ठरत आहे. गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही तालुक्यातील सर्वात जास्त कोरोना बाधित रुग्ण सरुड गावात आढळून आले होते. गतवर्षीपासून आज अखेर सरुड गावात १०९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या गावात दररोज कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. यावर्षी १ एप्रिलपासून शनिवारअखेर २९ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. गावात कोरोनाचा धोका वाढला असतानाही गावातील नागरिकांनी कोरोनाचा हा संभाव्य धोका गांभिर्याने घेतला नसल्याचे त्यांच्या बेफिकिरीवरून दिसून येत आहे. कोरोना ससंर्गाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना राबविल्या जात असल्या तरी नागरिकांच्याकडून शासनाच्या नियमांचे पालन होताना दिसत नसल्याने गावातील रुग्ण संख्या वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.