अडथळ्यांच्या शर्यतीत किरणांचा अस्त!

By Admin | Published: February 3, 2017 12:33 AM2017-02-03T00:33:14+5:302017-02-03T00:33:14+5:30

अंबाबाई किरणोत्सव : अखेरच्या दिवशी किरणे देवीच्या कटांजलीपर्यंतच; भाविकांची निराशा; अडथळे दूर करण्याची मागणी

Risks in hurdles | अडथळ्यांच्या शर्यतीत किरणांचा अस्त!

अडथळ्यांच्या शर्यतीत किरणांचा अस्त!

googlenewsNext

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मूर्तीच्या किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी किरणे गर्भकुटीजवळील देवीच्या कटांजलीपर्यंतच पोहोचून डावीकडे लुप्त झाली. त्यामुळे अखेरच्या दिवशी तरी किरणे मूर्तीच्या चेहऱ्यावर पडून किरणोत्सव पूर्ण होईल, ही भाविकांची अपेक्षा फोल ठरली.
अंबाबाईच्या उत्तरायणातील किरणोत्सवाची मूळ तारीख ३१ जानेवारी, १ व २ फेबु्रवारी असली तरी किरणोत्सव ३० जानेवारीपासूनच सुरू झाला होता. त्यानुसार पहिल्या दिवशी किरणे मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत, तर ३१ व १ या दोन तारखांना मूर्तीच्या कमरेपर्यंतच पोहोचली. बुधवारी सूर्यकिरणांची प्रखरता चांगली होती. त्यामुळे गुरुवारी अखेरच्या दिवशी किरणे देवीच्या मुखावर पडून किरणोत्सव पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे मंदिरात भाविकांचीही मोठी गर्दी झाली होती. मात्र, किरणोत्सव मार्गातील इमारतींच्या अडथळ्यांमुळे बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सूर्यकिरणांची प्रखरता कमी झाली. किरणोत्सवामध्ये रंकाळा तलाव परिसर, हरिओमनगर, आदी भागांतील उंच इमारती व महाद्वार रोडवरील काही इमारतींमुळे गेल्या काही वर्षांपासून अडथळा निर्माण होत आहे.
महाद्वारातून ५ वाजून ३५ मिनिटांनी सूर्यकिरणे मंदिरात प्रवेश करताना त्यांची तीव्रता १५ हजार ६०० लक्स होती. जी किरणोत्सव पूर्ण होण्याच्या दृष्टीने कमी होती. किरणे गाभाऱ्यातील पहिल्या पायरीवर आली तेव्हा त्यांची तीव्रता १ हजार चार, दुसऱ्या पायरीवर पोहोचली तेव्हा केवळ ६३ लक्स होती.
त्यामुळे किरणे पुढे सरकताना ती आणखी कमी होत गेली. तिसऱ्या पायरीवरून ६ वाजून १५ मिनिटांनी ती गर्भकुटीच्या कटांजलीपर्यंत पोहोचली; तर ६ वाजून १६ ते ६ वाजून १८ मिनिटांपर्यंत ती डावीकडे झुकत लुप्त झाली. त्यामुळे यंदाचा किरणोत्सव अपूर्ण झाला. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर,
नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगररचना खात्याचे सहायक संचालक धनंजय खोत, नारायण भोसले, अभ्यासक प्रा. किशोर हिरासकर,
प्रा. मिलिंद कारंजकर, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, देवस्थान समितीचे अभियंता सुदेश देशपांडे, आदी
उपस्थित होते.


करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या किरणोत्सव सोहळ्यात अडथळा ठरणाऱ्या बाबींचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीनेही गुरुवारी सूर्यकिरणांना देवीच्या मूर्तीवर पोहोचण्यासाठी अडथळा ठरणाऱ्या बाबींचा अभ्यास केला. यावेळी नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, नगर रचनाचे सहायक संचालक धनंजय खोत, प्रा. मिलिंद कारंजकर, प्रा. किशोर हिरासकर, आदी उपस्थित होते. दुसऱ्या छायाचित्रात किरणोत्सव सोहळ्यात अडथळा ठरणारी इमारत, तर तिसऱ्या छायाचित्रात किरणोत्सव सोहळ्यातील अखेरच्या दिवशी गुरुवारी सूर्याची किरणे देवीच्या कटांजलीपर्यंतच पोहोचली.


किरणोत्सव अडथळ्यांसाठी नेमलेल्या समितीमार्फत किरणोत्सवाची मार्ग निश्चिती केली जात आहे. त्याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवून या परिसरातील बांधकाम परवानगी नियंत्रित करू.
- धनंजय खोत, सहायक संचालक, नगररचना

किरणोत्सवात अडथळे ठरणाऱ्या मिळक तधारकांच्या मिळकती शहराच्या नकाशात निश्चित करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये रंकाळा तलाव परिसर व हरिओमनगर, ताराबाई रोड, महाद्वार रोड परिसरातील ५० मिळकती निश्चित करण्याचे काम सुरू आहे. हा अहवाल शासनाकडे पाठवू.
- नेत्रदीप सरनोबत,
नगर अभियंता, कोल्हापूर महापालिका

 

Web Title: Risks in hurdles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.