आरआयटीचा पदवीदान समारंभ शनिवारी
By admin | Published: October 28, 2015 11:19 PM2015-10-28T23:19:21+5:302015-10-29T00:15:36+5:30
विविध कार्यक्रम : शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची प्रमुख उपस्थिती
इस्लामपूर : स्वायत्त शिक्षण संकुलाचा दर्जा मिळवलेल्या आणि खासगी तत्त्वावरील राज्यातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय असा नावलौकिक कमावलेल्या राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमधील पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३१ आॅक्टोबरला (शनिवारी) तिसरा पदवीदान समारंभ होणार असल्याची माहिती प्राचार्या डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि पेटंट मिळवण्याच्या क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देणारे प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दुपारी २ वाजता हा कार्यक्रम होईल. माजी मंत्री आ. जयंत पाटील अध्यक्षस्थानी असतील. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या अनुदान मंडळाने संचालक डॉ. डी. आर. मोरे, आरआयटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष भगतसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या पदवीदान समारंभात बी. टेक., एम. टेक. आणि एम. बी. ए. विभागातील ९३९ विद्यार्थ्यांना डॉ. माशेलकर यांच्याहस्ते पदवी प्रमाणपत्र तसेच यावर्षीचा आदर्श विद्यार्थी यासह तीन विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देण्यात येणार आहे. त्यामध्ये बी. टेक. मधून प्रशांतकुमार अजय कुंभारकर (संगणक शास्त्र), एम. टेक. मधून प्रवीण संभाजी गोसावी (मेकॅनिकल डिझाईन) आणि एम. बी. ए. मधून प्रियांका पोपट यादव यांचा समावेश आहे. यावेळी कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, रजिस्ट्रार प्रा. राजन पडवळ उपस्थित होते. (वार्ताहर)