काँग्रेसच्या लिस्टमध्ये ऋतुराज, मधुरिमा व दौलत देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:37 AM2019-08-31T11:37:05+5:302019-08-31T11:41:11+5:30
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे किंवा थेट माजी आमदार मालोजीराजे व दौलत देसाई या नावांवर पक्षाच्या केंद्रीय समितीत गांभीर्याने विचार सुरू आहे. मधुरिमा किंवा मालोजीराजे यांनी निवडणूक लढविण्याबद्दल स्वत: शाहू छत्रपती यांची तयारी नसल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून पुन्हा त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. ऋतुराज पाटील हा एक पक्षापुढे सक्षम पर्याय आहे; परंतु एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवार देण्याबाबत हरकती घेतल्या जात आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ऋतुराज पाटील, मधुरिमाराजे किंवा थेट माजी आमदार मालोजीराजे व दौलत देसाई या नावांवर पक्षाच्या केंद्रीय समितीत गांभीर्याने विचार सुरू आहे. मधुरिमा किंवा मालोजीराजे यांनी निवडणूक लढविण्याबद्दल स्वत: शाहू छत्रपती यांची तयारी नसल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून पुन्हा त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. ऋतुराज पाटील हा एक पक्षापुढे सक्षम पर्याय आहे; परंतु एकाच कुटुंबातील दोघांना उमेदवार देण्याबाबत हरकती घेतल्या जात आहेत.
चांगला उमेदवार दिल्यास या मतदारसंघातून काँग्रेसला चांगली संधी आहे; परंतु उमेदवार ठरवितानाच पक्षाची दमछाक होऊ लागली आहे. एका बाजूला लढण्यासाठी सोडाच, पक्षाची उमेदवारी घेण्यासाठीही कोण उमेदवार मिळेनात, अशी स्थिती आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन जागांसाठी पाच लोकांचे अर्ज आले आहेत.
पुणे ग्रामीणपासून ते सोलापूर, सातारा जिल्ह्यांतही पक्षाकडे अर्ज न्यायलाही कोण फिरकलेले नाहीत. असे असतानाही एकाच घरात दोन उमेदवार कशाला, असा मुद्दा पक्षांतर्गत राजकीय कुरघोडीतून पुढे आणला जात आहे. हा मुद्दा कोल्हापुरात जसा पुढे आला आहे, तसाच तो लातूरमध्येही आणला जात आहे. ऋतुराज पाटील यांनी लढायची तयारी केली आहे.
गेल्या दोन वर्षांतील त्यांचा प्रत्येक सार्वजनिक कार्यातील वावर व परवाच्या महापुरातील सहभाग पाहता, ते रिंगणात उतरतील, असा अनेकांचा होरा आहे. त्यांच्याशिवाय मधुरिमा राजे यांचेही नाव कायमच सक्षम उमेदवार म्हणून पुढे येत आहे; परंतु शाहू महाराज यांच्याकडून त्यास अजून संमती मिळालेली नाही; यासाठी दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या अनुषंगाने शाहू महाराज यांच्याशीच थेट बोलून विनंती करावी, अशा हालचाली सुरू आहेत. कदाचित आज, शनिवारी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेही त्यांच्याशी संपर्क साधण्याची शक्यता आहे.
गेले १५ वर्षे विविध सामाजिक कामांत सक्रीय असलेले दौलत देसाई यांनीही या वेळेला पक्षाकडे उमेदवारी मागितली असून, निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्यांचे काका माजी आमदार दिवंगत दिलीप देसाई हे याच मतदारसंघातून शिवसेनेकडून १९९० ला निवडून आले होते; त्यामुळे त्यांना हा मतदारसंघ नवीन नाही. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोखले कॉलेजच्या माध्यमातून घरोघरी आपला संपर्क असल्याचा त्यांचा दावा आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर चांगली लढत देऊ, असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे.
काही झाले तरी लढणारच : सत्यजित कदम
गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून मोदी लाटेतही दोन नंबरची मते घेतलेले सत्यजित कदम यांनीही काही झाले तरी निवडणूक लढविणारच अशी घोषणा केली आहे. महापालिकेतील ते ज्येष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी कदमवाडी, भोसलेवाडी, रुईकर कॉलनी, आदी भागांतून ८ नगरसेवक निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
महापालिकेत ते ताराराणी आघाडीचे नेते आहेत. माजी खासदार धनंजय महाडिक हे जरी भाजपमध्ये गेले, तरी या आघाडीचे अस्तित्व कायम ठेवण्यात येणार आहे; त्यामुळे या आघाडीकडूनही ते रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शिवसेना-भाजप स्वतंत्र लढली, तर ते या मतदारसंघातून भाजपकडूनही प्रयत्न करू शकतात. सत्यजित कदम यांचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी हाडवैर आहे. त्याचबरोबर आमदार सतेज पाटील गटाशीही त्यांचा राजकीय संघर्ष आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची ताकद त्यांच्यामागे असेल.