विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाचा ऋतुराज पाटील यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 11:24 AM2020-10-29T11:24:16+5:302020-10-29T11:27:33+5:30
Airport, Ruturaj Patil, kolhapur कोल्हापूर येथील विमानतळ विस्तारीकरणाअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी आढावा घेतला. या कामांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.
कोल्हापूर : येथील विमानतळ विस्तारीकरणाअंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी आढावा घेतला. या कामांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या.
विमानतळ विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू आहे. नाईट लँडिंग, मुरूम आणि भराव टाकून विस्तृत धावपट्टी निर्माण करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचे टर्मिनल बिल्डिंग बांधकाम असे अनेक कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. त्या अनुषंगाने विमानतळाला भेट देऊन कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांच्याकडून या सर्व कामांचा आमदार पाटील यांनी आढावा घेतला.
सध्या धावपट्टी बनविण्याचे काम सुरू आहे. आगामी काळात याठिकाणी एअर बस आणि बोईंग या कंपनीची आवाढव्य विमाने उतरावीत त्यादृष्टीने विस्तारीकरण सुरू आहे. विमानतळावरून लवकरच दिल्ली, अहमदाबाद या शहरांनाही विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती संचालक कटारिया यांनी दिली. यावेळी बालाजी इन्फ्राटेकचे रिजनल डायरेक्टर शंभूराजे मोहिते, गोकुळचे माजी संचालक बाबासो चौगुले, सचिन पाटील आदी उपस्थित होते.
सर्वोतोपरी प्रयत्न
अद्यावत सुविधेसह विमानतळ व्हावे यासाठी पालकमंत्री सतेज पाटील प्रयत्नशील आहेत. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. विस्तारीकरणाचे काम गतीने करण्याचे आणि प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठीही प्रयत्न करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.