ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार, काँग्रेसकडून लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 04:24 PM2019-09-05T16:24:31+5:302019-09-05T16:40:46+5:30
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. ऋतुराज पाटील हे विधानसभेचे उमेदवार असतील आणि ते कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसकडून लढणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी गटाच्या मेळाव्यात गुरुवारी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची या मेळाव्यास उपस्थिती होती.
कोल्हापूर : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. ऋतुराज पाटील हे विधानसभेचे उमेदवार असतील आणि ते कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसकडून लढणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी गटाच्या मेळाव्यात गुरुवारी सांगितले. विशेष म्हणजे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांची या मेळाव्यास उपस्थिती होती.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सतेज कार्यकर्ता संवाद मेळावा गुरुवारी येथील ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्क येथे झाला. या मेळाव्यात कोल्हापूर दक्षिण आणि कोल्हापूर उत्तर मतदारसंघांसह जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मते ऐकून घेऊन पुढील दिशा ठरविण्यात आली.
ऋतुराज याला आपल्या पदरात घ्या, असे आवाहन या मेळाव्यात सतेज पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी महाडिक यांच्यावर टीकास्त्र सोडले. मंडलिक यांनी नव्या पिढीला शिवसेनेत संधी द्या असे आवाहन करत ऋतुराज यांना विधानसभेची आॅफर दिली.
काँग्रेसची सध्या सत्वपरिक्षा सुरु आहे. मरेपर्र्यत या पक्षाची साथ मी सोडणार नाही असे स्पष्ट केले. एकाच घरात अनेक पक्षाची सत्ताकेंद्र असण्याला माझा विरोध आहे. या विरोधात माझा लढा सुरु आहे असे सांगत सतेज यांनी ही आॅफर नाकारली.
मंडलिक यांचे पण आता ‘आमचं ठरलंय..!
कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांना लोकसभेला सतेज पाटील यांनी पाठिंबा देत उघड भूमिका घेतली होती. आता मंडलिक यांनीही विधानसभा निवडणूकीत आमचं ठरलंय अशी भूमिका घेत ऋतुराज पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला.
खासदार प्रा. मंडलिक यांनी या मेळाव्यात बोलताना लोकसभा निवडणुकीवेळी ‘आमचं ठरलंय’ ही उघड भूमिका घेवून मला आमदार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी मदत केली; त्यामुळे एक मित्र म्हणून या मेळाव्यास मी उपस्थित आहे. ऋतुराज पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले.
लोकसभा निवडणूकीत कोल्हापूर दक्षिणचे भाजपचे आमदार अमल महाडिक हे मंडलिक हे युतीचे उमेदवार असतानाही राष्ट्रवादीचे उमेदवार व चुलतभाऊ धनंजय महाडिक यांच्या प्रचारात सक्रीय होते. त्यामुळे याता त्याचा वचपा काढण्यासाठी मंडलिक हे सतेज पाटील गटाला बळ देणार आहेत. शिवसेनेची या मतदार संघात कांही गावांत हुकमी मते आहेत.
विधानसभा निवडणूकीत भाजप-शिवसेनेची युती असतानाही मंडलिक यांनी जाहीरपणे काँग्रेसच्या उमेदवारास बळ देण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील पुढील राजकीय फेरमांडणी कशी होणार याचीच ही चुणूक आहे.