‘दौलत’ ‘अथर्व’ला भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 07:59 PM2019-02-18T19:59:37+5:302019-02-18T20:02:32+5:30
हलकर्णी (ता. करवीर) दौलत शेतकरी सहकार साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा फैसला शुक्रवारी (दि. २२) जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत होणार आहे. अथर्व ट्रेडींग कंपनीने ३९ वर्षे भाडेतत्त्वावर कारखाना मागितला असून, त्यांनाच पहिल्यांदा संधी मिळण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर : हलकर्णी (ता. करवीर) दौलत शेतकरी सहकार साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा फैसला शुक्रवारी (दि. २२) जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत होणार आहे. अथर्व ट्रेडींग कंपनीने ३९ वर्षे भाडेतत्त्वावर कारखाना मागितला असून, त्यांनाच पहिल्यांदा संधी मिळण्याची शक्यता आहे.
दौलत कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी जिल्हा बॅँकेने २ जानेवारी रोजी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार चंदगड तालुका खरेदी विक्री संघ व अथर्व ट्रेडींग कंपनी, शाहूपुरी यांनी निविदा दाखल केल्या होत्या. या निविदात चंदगड तालुका संघाने ४० वर्षे मुदतीने कारखाना मागितला आहे.
दौलतची सुमारे १६२ कोटींची थकीत देणी आहेत. या देणीसाठी समान दहा हप्ते देण्याची मागणी संघाने जिल्हा बॅँकेकडे केली आहे. तर अथर्व ट्रेडींग कंपनीने ३९ वर्षे मुदतीने कारखाना मागितला आहे. निविदा प्रक्रियेनुसार अथर्व कंपनीचा प्राधान्याने विचार होण्याची शक्यता आहे.
जिल्हा न्यायालयाने न्यूट्रीयंटसचा दावा फेटाळला आहे, त्यामुळे शुक्रवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय अपेक्षित आहे. लवाद नेमण्याबाबत न्यूट्रीयंटस उच्च न्यायालयात गेली आहे. तेथील निकालाचाही निविदा प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
दरम्यान, दौलतची जिल्हा बॅँकेची ६७ कोटींची थकबाकी आहे; त्यावरील व्याज सुमारे २७ कोटी होते. जिल्हा, शासकीयसह इतर देणी सुमारे १६२ कोटी आहेत. त्यामुळे भाडेतत्त्वाचा कालावधी कमी असून चालणार नाही, ही देणी कशा पद्धतीने परतफेड करणार, हे पाहूनच करार होणार आहे.