नदी म्हणजे आई, व्यक्ती, समाज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:05 AM2017-09-18T01:05:43+5:302017-09-18T01:05:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नदी म्हणजे फक्त पाणी नव्हे, नदी म्हणजे जिवंत व्यक्ती, आपली आई व समाज होय. त्यामुळे नदी वाचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे मत मुंबई आय.आय.टी.चे प्रा. डॉ. श्याम असोलेकर यांनी कोल्हापुरात रविवारी व्यक्त केले.
आठवा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रा. असोलेकर यांना ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. आर. व्ही. भोसले यांच्या हस्ते ‘वसुंधरा’ सन्मानाने गौरविण्यात आले. त्यावेळी ते ‘नदी वाचवा - जीवन वाचवा’ या विषयावर बोलत होते. सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या सन्मानाचे स्वरूप होते. जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘किर्लोस्कर’चे व्हाईस प्रेसिडेंट (मार्केटिंग) संजीव निमकर, चंद्रहास रानडे, दळवीज आर्ट आॅफ इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजेय दळवी, आदींची प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवनात रात्री महोत्सवाचा समारोप झाला.
श्याम असोलेकर म्हणाले, भारतात प्रमुख १४ नद्या आहेत. त्यांपैकी गंगा ही सर्वांत मोठी नदी आहे. तिचा अभ्यास मी केला आहे. नदीत प्राणी, कीटक, जंतू असतात; तसेच नदीकाठावर लोकवस्ती असते. त्यामुळे नदी म्हणजे हा एक समाज आहे. आपण २५ वर्षे पर्यावरणाचे रक्षण करतो आहे. त्यामुळे त्याच्या विकासासाठीचा हा लढा आहे. आज देशात ९० कोटी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. येथील अर्थव्यवस्था शेतीशी निगडित आहे. सुमारे सहा लाख खेडी असून, ५३ मोठी शहरे आहेत. विशेषत: नदी प्रदूषित होण्याचे मुख्य कारण नागरी वस्तीतील घनकचरा होय.
सुभेदार म्हणाले, यंदाच्या गणेशोत्सवामध्ये जिल्ह्यात चार लाख गणेश मूर्तिदान, तर १५०० ट्रॉली या निर्माल्य झाले. त्यामुळे नदी प्रदूषित होण्यापासून वाचली, याचा मला आनंद आहे. त्याचबरोबर १४४ कलम लावून डॉल्बी बंदी केला. याचे श्रेय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हा व पोलीस प्रशासनाला जाते.
संजीव निमकर यांनी, सात वर्षांपासून पर्यावरणपूरक हा विषय घेऊन हा महोत्सव राबवीत आहे. भारतभर असे कार्यक्रम कंपनीच्या वतीने करतो, असे सांगितले.
यावेळी ‘सायबर’चा विद्यार्थी किशोर आरेकर, शाल्मली गोडसे व शिवाजी विद्यापीठाचा वीरेश शिवपुजे, तर युवा शास्त्रज्ञ अनिकेत कामत यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. को-आॅर्डिनेशन कमिटीचे व्हाईस प्रेसिडेंट कृष्णा गावडे यांनी प्रास्ताविक, तर पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी स्वागत केले. यावेळी ‘किर्लोस्कर’चे चंद्रहास रानडे, वीरेंद्र चित्राव, प्रा. रवी निकम, आदी उपस्थित होते.