नदी उशाला तरी कोरड घशाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:46 AM2021-03-13T04:46:07+5:302021-03-13T04:46:07+5:30

रमेश सुतार : बुबनाळ सन २०१० साली मंजूर झालेल्या गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम दहा वर्षांपासून ...

The river swelled but dried up | नदी उशाला तरी कोरड घशाला

नदी उशाला तरी कोरड घशाला

Next

रमेश सुतार : बुबनाळ सन २०१० साली मंजूर झालेल्या गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम दहा वर्षांपासून रखडले आहे. जिल्हा परिषद आणि ठेकेदार यांच्या वादामुळे कृष्णा नदीकाठालगत असणाऱ्या गणेशवाडीत पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत असल्याने ‘नदी उशाला, तरी कोरड घशाला’ अशी अवस्था ग्रामस्थांची झाली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेलगत असणारे गणेशवाडी गाव कृष्णा नदीकाठालगत आहे. या गावाला शेडशाळ, कवठेगुलंद, गणेशवाडी पाणीपुरवठा संस्थेतून पाणीपुरवठा होतो. मात्र, अपुरा पाणीपुरवठा, वारंवार होणारी गळती यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१० साली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय पेयजल योजनेसाठी ३ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर होऊन काम सुरू झाले. मात्र, ठेकेदार आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या वादामुळे ८० टक्के काम होऊनदेखील योजनेचे काम दहा वर्षे रेंगाळले आहे. २०१४ साली कामांची मुदत होती. मात्र, सहा वर्षे होऊनदेखील काम थांबले आहे. याबाबत ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे तक्रार केल्यानंतर बैठकांचा फार्स करण्यात आला आहे. मात्र, काम सुरू झाले नाही. २०१९ च्या महापुरात जॅकवेलवरचे साहित्य वाहून गेले आहे. महापुरात जॅकवेलजवळची माती ढासळल्यामुळे एका बाजूला झुकले आहे. फिल्टर हाऊसचे कामही अपूर्ण आहे. यामुळे गावातील १२०० कुटुंबियांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेकांना बोअरचे पाणी वापरत गुजराण करावी लागत आहे.

---------------------------

कोट - पेयजल योजनेचे काम मंजूर होऊन दहा वर्षे झाली तरी काम अपूर्ण आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकावे लागत आहे. याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांनी लक्ष घालून तातडीने प्रश्न सोडवावा.

- प्रशांत अपिने, सरपंच गणेशवाडी ग्रामपंचायत.

फोटो - १२०३२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीकाठालगत असणाऱ्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पाण्याच्या जॅकवेल महापुरामुळे झुकला आहे. (छाया - रमेश सुतार)

Web Title: The river swelled but dried up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.