नदी उशाला कोरड पिकांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:16 AM2021-07-19T04:16:12+5:302021-07-19T04:16:12+5:30

कुरुंदवाड : धरण परिसरात बरसणाऱ्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीपात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे नदीकाठावरील विद्युत मोटारी शेतकऱ्यांनी काढल्या आहेत. ...

River Ushala dry crops | नदी उशाला कोरड पिकांना

नदी उशाला कोरड पिकांना

Next

कुरुंदवाड : धरण परिसरात बरसणाऱ्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीपात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे नदीकाठावरील विद्युत मोटारी शेतकऱ्यांनी काढल्या आहेत. मात्र, या भागात पाऊसच नसल्याने पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली असून नदी उशाला आणि कोरड पिकांना अशीच अवस्था येथील शेतकऱ्यांची झाली आहे.

पंचगंगा, कृष्णा, वारणा आणि दुधगंगा या नद्यांमुळे शिरोळ तालुका हरितक्रांतीचा बनला आहे. मात्र, पंचगंगेचे दूषित, प्रदूषित पाणी, जलपर्णीचे संकट आणि पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्याला बसतो. यामुळे वरदान ठरलेली पंचगंगा नदी शेतकऱ्यांसाठी वर्षातील सहा-सात महिने काळ ठरत असते.

पंचगंगा नदीचे पात्र अरुंद असल्याने तसेच नदीकाठच्या शेतकऱ्यांनी बेसुमार माती उपसा केल्याने पावसाळ्यात पाणलोट क्षेत्रातील येणारे पावसाचे पाणी आणि आलमट्टी धरणाचे बॅकवॉटर यामुळे थोड्या पावसानेही पंचगंगा नदी पात्राबाहेर पडते. त्यामुळे शेतकरी, पाणीपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्थांना विद्युत मोटारी काढून ठेवाव्या लागतात.

जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सूनने चांगली सलामी दिल्याने उसासह सोयाबीन, भुईमूग, भात, भाजीपाला पिकांनी जोर धरला होता. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पाऊस जोर धरेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, पाऊस नाही, धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने पाण्याच्या विसर्गातून पंचगंगा नदी पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती पंपाची विद्युत मोटारी काढून सुरक्षित ठेवल्याने पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पंचगंगा नदी पाणी उशाला आणि कोरड पिकांना अशीच झाली आहे.

Web Title: River Ushala dry crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.