नदी, नाले, धरणे तुडूंब; तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:08 PM2019-11-22T12:08:57+5:302019-11-22T12:11:12+5:30

दुस-या आठवड्यापासून पाऊस थांबल्याने नवी पेरणी आणि ऊसपिकासाठी पाण्याची गरज वाढू लागल्याने शेतकºयांनी धावाधाव सुरू केली. ‘महावितरण’कडून ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले तरी काम संपत नसल्याने शेतकºयांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे.

 Rivers, drains, dams; Yet water in the eyes of the farmers | नदी, नाले, धरणे तुडूंब; तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

नदी, नाले, धरणे तुडूंब; तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Next
ठळक मुद्देअपूर्ण वीजजोडण्यांमुळे पिकांची पाण्याअभावी होरपळ

कोल्हापूर : तब्बल साडेपाच महिने मुक्काम ठोकलेल्या पावसाने मुळातच पाणीदार असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, धरणे पाण्याने तुडुंब भरली आहेत; पण पाणी उपसण्यासाठी आवश्यक विजेच्या जोडण्याच अद्याप पूर्ण झाल्या नसल्याने पिकांची होरपळ होताना पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाण्याने डबडबू लागले आहेत. आधीच खरीप वाया गेला. जे उरले ते परतीच्या पावसाने हिरावून नेले. रब्बी हंगाम साधावा म्हटले तरी पेरलेल्या पिकाला पाणी कशाने पाजायचे, असा प्रश्न शेतकºयांना छळत आहे.

‘महावितरण’कडे वारंवार पाठपुरावा करूनही ‘दुरुस्ती सुरू आहे,’ याच्यापलीकडे काहीही उत्तर मिळत नसल्याने शेतकरी हतबल आहे.
महापुरामुळे शेतीच्या जोडीने वीजपुरवठा करणा-या जोडण्यांचेही मोठे नुकसान झाले. मोठमोठ्या ट्रान्सफॉर्मरसह विजेचे पोलही तुटून पडले. महापुरानंतर परतीचा पाऊस नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहिल्याने त्यांची दुरुस्तीही करणे शक्य झाले नाही. पिकांनाही पाण्याची गरज नसल्याने दुरुस्तीची कामे संथगतीने सुरू राहिली. दुस-या आठवड्यापासून पाऊस थांबल्याने नवी पेरणी आणि ऊसपिकासाठी पाण्याची गरज वाढू लागल्याने शेतकºयांनी धावाधाव सुरू केली. ‘महावितरण’कडून ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले तरी काम संपत नसल्याने शेतकºयांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे.

आता गहू, हरभरा, ज्वारी या रब्बी पिकांसह कमी कालावधीतील भाजीपाला पिके घेण्यासाठी पेरणीची घाई सुरू आहे. शिवाय आडसाली ऊसलागण पूर्णपणे वाया गेल्याने पूर्वहंगामाचे शेवटचे दिवस साधण्यासह सुरू हंगामातील ऊसलागणीची तयारी सुरू आहे. या लागवडी आटोपण्याची घाई सुरू असताना लागणारे पाणी मात्र जवळच असतानाही ते विजेअभावी उपसता येत नाही, अशी परिस्थिती आहे. वेळेत पाणी न मिळाल्यास रब्बीचा पेरा साधता येणार नाही. ऊसलागण हंगाम पुढे सरकण्याच्या चिंतेने शेतकºयाच्या वीज कार्यालयाकडील चकरा वाढल्या आहेत. बºयाच ठिकाणी वीजजोडण्यांचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. एकीकडे जोडत गेले तरी दुसरीकडे नादुरुस्तीच्या तक्रारी येत असल्याने यंत्रणा पुन्हा अडकून पडत आहे. शेतकºयांचा दिवस वीजजोडण्या करून घेण्यातच जात आहे. मग त्यासाठी स्वत:च्या खिशातून खर्चही करावा लागत आहे. सर्व्हिस वायरपासून ते फ्युज आणण्यापर्यंतची धावपळ शेतकºयांनाच करावी लागत आहे.

अजून ४०२ ट्रान्सफॉर्मर व २६६२ पोलची जोडणी अपूर्ण
महापूर काळात १७७१ ट्रान्सफॉर्मर, ६६३८ पोल नादुरुस्त झाले होते. त्यामुळे ६७ हजार ७६९ शेतकºयांचा वीज पुरवठा बंद झाला होता. आतापर्यंत १३६९ ट्रान्सफॉर्मर, ३९७६ पोल नव्याने जोडून तयार ठेवले आहेत. अजून ८ हजार ४९ शेतकºयांना वीज जोडणी करणारे ४०२ ट्रान्सफॉर्मर, २६६२ पोल जोडण्याचे काम अपूर्ण आहे. या आठवडाभरात उर्वरीत काम पूर्ण होईल, असे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.

अडीच हजार कर्मचा-यांच्या कष्टांचे चीज
शेतीला वीजपुरवठा करणाºया यंत्रणेला महापूरकाळात जोरदार फटका बसला. दुरुस्ती करायची म्हटली तरी दलदलीमुळे पोहोचणे शक्य नव्हते. तरीदेखील ‘महावितरण’च्या जिल्ह्यातील जवळपास अडीच हजार कर्मचाºयांनी अविरत कष्ट घेऊन दुरुस्तीचे काम सुरू केले. आतापर्यंत ७० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे.
 

Web Title:  Rivers, drains, dams; Yet water in the eyes of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.