सरकारविरोधात रस्त्यावर या; मी तुमच्यासोबत : उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 01:01 AM2017-11-26T01:01:13+5:302017-11-26T01:07:19+5:30
कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करून घेतात, तर मग महाराष्टÑातील व्यापारी हे का करू शकत नाहीत? तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करीत, सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊ
कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करून घेतात, तर मग महाराष्टÑातील व्यापारी हे का करू शकत नाहीत? तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करीत, सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्याची तुमची तयारी असेल तर मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे व्यापारी-उद्योजकांना दिली.
टेंबलाई उड्डाणपुलाजवळील एका हॉटेलमध्ये आयोजित व्यापारी-उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सतर्फे व्यापारी व उद्योजकांच्या ‘जीएसटी’सह विविध अडचणी व प्रश्नांंबाबतचे निवेदन उद्धव ठाकरे यांना दिले. यानंतर उद्योजक, व्यापाºयांनी आपल्या अडचणी व प्रश्न मांडले.
उद्धव ठाकरे म्हणाले, व्यापारी व उद्योजकांनी आपल्याकडे मांडलेल्या प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्र्याशी चर्चा करू; परंतु ‘जीएसटी’सह विविध प्रश्नांवर महाराष्टÑातील व्यापारी, उद्योजक गप्प का आहेत, असा प्रश्न पडतो. ते दबलेले असून आपल्या न्यायासाठी त्यांचे त्यांनाच उभे राहावे लागेल. त्यांनी रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्याची तयारी ठेवल्यास मीही त्यांच्यासोबत राहीन. त्यांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. जानेवारी महिन्यात मुंबईत व्यापारी व उद्योजकांच्या प्रश्नांवर बैठक घेतली जाईल.
चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने म्हणाले, केंद्र व राज्य सरकारकडून व्यापारी व उद्योजकांसाठी जे काही करता येईल त्यासाठी प्रयत्न केले जावेत.
उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले, उद्योगासाठी विजेचे दर कमी करण्यासाठी सरकारकडे भूमिका मांडली जावी. कोल्हापूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सदानंद कोरगावकर म्हणाले, शहरात दिल्लीसारखे ट्रॅफिक झाले असून यासाठी उड्डाणपूल होण्याची गरज आहे. तसेच वॉल मार्क कंपनीला शिवसेनेने बाजारात पाय ठेवू देऊ नये.
‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या विकासासाठी एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करावेत. माजी अध्यक्ष सुरेंद्र जैन म्हणाले, कोल्हापूरच्या विकासासाठी कोल्हापूर-बंगलोर कॉरिडॉरला चालना मिळावी.
गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरजितसिंह पोवार म्हणाले, उद्योगवाढीसाठी जागा उपलब्ध नसून ती उपलब्ध करून द्यावी. इलेक्ट्रिकल असोसिएशनचे अध्यक्ष अजित कोठारी म्हणाले, शेतीउपयोगी इलेक्ट्रिक साहित्यावरील ‘जीएसटी’चे दर कमी व्हावेत.
‘क्रीडाई’चे अध्यक्ष महेश यादव म्हणाले, बांधकाम व्यावसायिकांच्या अडचणीबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी. केमिस्टस असोसिएशनचे अध्यक्ष मदन पाटील म्हणाले, ‘जीएसटी’मुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून औषधांचे दर वाढले आहेत.
यावेळी संजय शेटे, गोरख माळी, जयेश ओसवाल, संदीप नष्टे, आदींसह व्यापारी उद्योजक उपस्थित होते.
सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडे
केंद्र व राज्य सरकार नोटाबंदीसारखे मनमानी निर्णय घेऊन सर्वसामान्यांना कष्टाच्या पैशांसाठी रांगेत उभे करीत असेल, तसेच स्वत:च्या पैशासाठी बोटाला शाई लावून घ्यावी लागत असेल, तर ही वाटचाल हुकूमशाही
आणि कम्युनिझमकडेच सुरू असल्याचे म्हणावे लागेल, असे ठाकरे यांनी सांगितले.
सरकार म्हणजे ‘नवसाचे पोर’
सरकार म्हणजे नवसाचे पोर असून ते उडाणटप्पू निघाल्यास काय बोलायचे ? असा टोला लगावत, ते पोर बिघडले म्हणून त्याला बोलण्याचे धाडस दाखवायचे का नाही? का नुसत्याच पेकाटात लाथा खायच्या, अशी कोटीही ठाकरे यांनी केली.