रस्ते मूल्यांकनाचा अहवाल बुधवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2015 01:13 AM2015-05-17T01:13:06+5:302015-05-17T01:13:06+5:30
काम अंतिम टप्प्यात : नोबेल कंपनी देणार ४९ कि़मी. रस्त्याच्या खर्चाचा ठोकताळा
कोल्हापूर : शहरातील रस्ते विकास प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या ४९ किलोमीटर्स रस्त्यांवर नेमका किती खर्च झाला आहे, याचा ठोकताळा असलेला अहवाल येत्या बुधवारी (२० मे) नोबेल कंपनी राज्य रस्ते विकास महामंडळाने नियुक्त केलेल्या मूल्यांकन समितीकडे सादर करणार आहे. रस्त्यांच्या मूल्यांकनाचे काम अंतिम टप्प्यात असून, अहवाल तयार करण्याचे काम रात्रं-दिवस सुरू असल्याचे सांगण्यात आले.
टोलविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार कोल्हापूरचा टोल रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यासाठी फेरमूल्यांकनाचा निर्णय घेऊन रस्ते विकास महामंडळाचे सह. व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मूल्यांकन समिती नियुक्त केली आहे. या समितीने मूल्यांकन करण्यासाठी नोबेल कंपनीची नेमणूक केली आहे. २१ एप्रिलपासून ही कंपनी मूल्यांकनाचे काम करीत आहे. कंपनीला एक महिन्याची मुदत देण्यात आली असून, मूल्यांकनातील काही त्रूटी निदर्शनास आल्याने त्या दूर करण्यास सांगण्यात आल्या आहेत. मूल्यांकनाच्या कामात महानगरपालिका, आर्किटेक्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही मदत केली आहे.
गेले महिनाभर रात्रं-दिवस मूल्यांकनाचे काम सुरू असून, ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. २० मे रोजी मूल्यांकनाचा ठोकताळा असलेला अहवाल मूल्यांकन समितीकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर तो रस्ते विकास महामंडळाकडे पाठविला जाईल. राज्य सरकारने ३१ मेपर्यंत कोल्हापूरचा टोल रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. (प्रतिनिधी)