दुभाजकाच्या वादात अडकला रस्ता

By admin | Published: February 23, 2017 12:47 AM2017-02-23T00:47:06+5:302017-02-23T00:47:06+5:30

रंकाळा टॉवर ते खर्डेकर दवाखाना : एकमत घडवून आणण्याकरिता आज बैठकीचे आयोजन

Road collapsed in the divider's dispute | दुभाजकाच्या वादात अडकला रस्ता

दुभाजकाच्या वादात अडकला रस्ता

Next



कोल्हापूर : रस्त्यावर दुभाजक असावा की नसावा, यावरून मतभेद निर्माण झाल्यामुळे रंकाळा टॉवर ते खर्डेकर दवाखाना हा रस्ता रखडला आहे. आधी ड्रेनेजच्या कामाने प्रशासनास घाईला आणले होते आणि आता नागरिकांतील मतभेदांमुळे प्रशासन घाईला आले आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून रखडलेला हा रस्ता सर्वसामान्य नागरिक, वाहनधारकांसाठी पूर्णत: कधी खुला होणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. रंकाळा परिसरातील नागरिकांमध्ये एकमत घडवून आणण्याकरिता आयुक्त पी. शिवशंकर यांनी प्रयत्न करण्याचे आदेश दिले असून, आज, गुरुवारी दुपारी अशी बैठक होत आहे.
नवीन वाशी नाका ते जावळाचा गणपती हा कोकणाला जोडणारा एक प्रमुख रस्ता आहे. तो आयआरबी कंपनीतर्फे करण्यात येणार होता; परंतु इराणी खण ते रंकाळा टॉवर या रस्त्यावरील ड्रेनेज लाईनचे काम गुंतागुंतीचे झाल्याने रस्त्याचे काम रखडले. त्यातच आयआरबी कंपनीने आपला कोल्हापुरातील गाशा गुंडाळला. त्यामुळे कंपनीचे रस्त्याचे काम अर्ध्यातच राहिले. नागरिकांच्या रेट्यामुळे महापालिकेच्या प्रशासनाने स्वनिधीतून हे काम करण्याचा निर्णय घेतला. पावणेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात विलंब झाला. निधी मिळाल्यावर कामाला सुरुवात झाली; पण नागरिकांनी अठरा मीटर रुंदीचाच रस्ता करावा म्हणून आग्रह धरला. काही ठिकाणी दोन-पाच फुटांनी अडथळे निर्माण झाले. घरे, मंदिरे आडवे येऊ लागली; त्यामुळे ती पाडायचीत की नाही, यावरही चर्चा सुरू झाली. महापौर कार्यालयात या संदर्भात बैठकाही झाल्या. दरम्यान, ठेकेदाराने काम सुरू केले. रस्त्याच्या नियोजनाप्रमाणे मध्ये काही अंतरापर्यंत रस्ता दुभाजकही करण्यात आला. या दुभाजकामुळे एक बाजूची रस्तारुंदी कमी होत असल्याचे लक्षात येताच पुढे दुभाजक घालणे बंद केले. सध्या तरी गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याचे कामच बंद पडले आहे.
परिसरातील नागरिकांचा एक गट रस्ता दुभाजक पाहिजेच, असा आग्रह करीत आहे; तर दुसऱ्या बाजूने दुभाजकाशिवाय रस्ता करावा, असा आग्रह धरत आहे. रस्ता दुभाजकावरून मतभेद निर्माण झाल्याने ठेकेदाराने काम थांबविले आहे. त्यामुळे रस्ता होणार तरी कधी? असा प्रश्न तयार झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Road collapsed in the divider's dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.