निधीअभावी रस्त्याची अवस्था दयनीय
By admin | Published: December 7, 2015 12:11 AM2015-12-07T00:11:44+5:302015-12-07T00:21:31+5:30
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : सहा वर्षांपूर्वी केली होती दुरुस्ती, उखडलेल्या रस्त्यामुळे ऊस वाहतुकीचे बैल जखमी
आबुब मुल्ला-- खोची -सहा वर्षांपूर्वी २५ लाख ४५ हजारांचा निधी वाठार-भादोले रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वापरला गेला. त्यानंतर भरीव निधीच रस्त्याला मिळालेला नाही. वाठार-भादोले या दोन्ही ग्रामपंचायतींनी यासाठी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा
केला; परंतु सहकार्याचा हात न देता सर्वांनीच हात वर केले. त्यामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला बागायत जमिनीचे क्षेत्र आहे. रस्त्याच्या म्हणजे दोन्ही गावच्या सेंटरला भादोले गावच्या हद्दीलगत चांदोली वसाहत आहे. म्हणजे वाठार-चांदोली वसाहत-भादोले या गावांतील ग्रामस्थांची लोकप्रतिनिधींना निवडणुकीत मते हवी असतात. परंतु, त्यांच्याच मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा प्रत्यय रस्त्याच्या दशेवरून येतो. ऊस वाहतुकीमुळे रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड ताण पडलेला आहे. उखडलेल्या खडीमुळे बैलगाडीतून ऊस वाहतूक करणाऱ्यांचे तर अतोनात हाल होत आहेत. बैलांचे पाय घसरणे,
ठेच लागणे यामुळे ते जखमी होत आहेत.
रस्ता उकरून खडी रस्त्यावर विखुरल्या आहेत. रस्त्यात आडव्या लांबलचक मोठ्या चरी आहेत. त्यामुळे दुचाकीपासून सर्व मोठ्या गाड्यांना चर-खड्डा, खडी चुकविताच येत नाही. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. प्रवाशांचे शारीरिक हाल होत आहेत. तालुक्यातील सर्वांत खराब रस्ता म्हणून प्रवासी प्रतिक्रिया व्यक्त करू लागले आहेत.
या महिन्यात ही अवस्था आहे. पावसाळ््यात प्रवास म्हणजे महासंकटच असते. २०१० मध्ये २५ लाख ४५ हजारांचा निधी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्राप्त झाला. तो आठ महिन्यांत खर्च करण्यात आला. तेव्हा काहीसे चांगले दळणवळण होईल, अशी आशा वाटली, पण गेल्या तीन-चार वर्षांत रस्ताच खराब झाला आहे. तो त्वरित चांगला व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात आलेला आहे; परंतु या मागणीला दुर्लक्षित केले आहे. या मार्गावरून शेतकरीवर्गाची ये-जा जास्त आहे. हे जरी खरे असले तरी सांगली-कोल्हापूर या दोन्ही शहरांत जाण्या-येण्यासाठी हा कमी अंतराचा मार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला जोडणारा हा रस्ता अत्यंत उपयुक्त आहे. जनतेच्या मागणीचा विचार करून हा रस्ता सुखकर प्रवासासाठी चांगला व्हावा, यासाठी अग्रक्रमाने लोकप्रतिनिधींनी निधी देणे गरजेचे आहे, अन्यथा याबाबत ग्रामस्थांकडून उद्रेक होईल. आंदोलनाचे मार्ग अवलंबिले जातील, अशी स्थिती आहे.
वाठार हे राष्ट्रीय मार्गालगतचे हातकणंगले तालुक्यातील प्रमुख ठिकाण आहे. या ठिकाणाहून जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांत प्रवास करण्यासाठी असंख्य प्रवासी दररोज येतात. सांगली, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा हा रस्ता होण्यासाठी ग्रामपंचायतीने संबंधित विभागाकडे मागणी केली आहे. जिल्हा परिषद सदस्य यांनी आश्वासन दिलेले आहे. रस्ता होण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे. रस्ता नाही झाला, तर आंदोलन करावे लागेल.
- काशीनाथ भोपळे,
सरपंच, वाठार तर्फ वडगाव
या रस्त्याच्या कामांसाठी २५ लाखांचा निधी मिळावा म्हणून जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव दाखल केला आहे. तातडीने सद्य:परिस्थिती लक्षात घेता रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. जनतेची मागणी योग्य असून, लोकप्रतिनिधी या नात्याने निधी देणारच. जानेवारीत कामाला सुरुवात होईल, अशी आशा आहे.
- मंदा घाटगे, जिल्हा परिषद सदस्य.