राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांची कामे मार्चअखेर पूर्ण : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2018 11:16 AM2018-11-06T11:16:40+5:302018-11-06T11:19:32+5:30
महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सर्व रस्त्यांची कामे येत्या मार्चअखेर पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते चकाचक करण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सर्व रस्त्यांची कामे येत्या मार्चअखेर पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्ते चकाचक करण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
चेतना अपंगमती विकास संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साधन संच संवेदना फौंडेशनच्यावतीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांना पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
चेतना अपंगमती विकास संस्थेच्या परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात मंत्री पाटील म्हणाले, गावात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. आगामी तीन वर्षांत शासन योजना आणि लोकसहभागाद्वारे गावात विकासाचे नव-नवे प्रकल्प हाती घेऊन गावे स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनविली जातील.
शासन योजना आणि लोकसहभागातून जिल्ह्यातील १९०० शाळा डिजिटल केल्या आहेत. शाळांना आवश्यक असणारी संरक्षक भिंत, क्रीडांगण उपलब्ध करून देण्याबरोबरच शाळा दुरूस्तीचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला आहे.
शिक्षण सभापती अमरिष घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.
संवेदना सोशल फौंडेशनचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी शैक्षणिक साधन संच उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. चेतना अपंगमती विकास संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. कन्या विद्यामंदिर भुयेवाडीचे मुख्याध्यापक विजयकुमार केंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी आभार मानले. यावेळी जिल्ह्यातील ३०० शाळांना शैक्षणिक साधन संच देण्यात आले. ‘पणन’चे विशेष लेखापरीक्षक बाळासाहेब यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.