कंत्राटदारांमार्फतच रस्त्यांची देखभाल
By admin | Published: May 8, 2017 12:57 AM2017-05-08T00:57:01+5:302017-05-08T00:57:01+5:30
कंत्राटदारांमार्फतच रस्त्यांची देखभाल
समीर देशपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : अपुरे मनुष्यबळ, नवीन भरतीवर असलेल्या निर्बंधांमुळे रस्त्यांची देखभाल आणि दुरुस्ती कंत्राटदारांमार्फतच करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. ‘वार्षिक देखभाल करार’या अंतर्गत ही कामे करून घेतली जाणार असून लवकरच या कामाच्या निविदा काढण्यात येणार आहेत. पावसाळ्यापासून राज्यभर या पद्धतीने देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू होणार आहेत.
जिल्ह्यातील सर्व प्रमुख राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्ग हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतात. त्यामध्ये बहुतांशी रस्त्यांवर वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते. शक्यतो हे सर्व रस्ते जिल्ह्यांना आणि तालुक्यांना जोडणारे असल्याने त्याची देखभाल आणि दुरुस्ती ही सातत्यपूर्ण करणे आवश्यक असते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्यांची देखभाल करणे आणि दुरुस्ती करणे यावर कमालीच्या मर्यादा येत आहेत.
खड्डे पडल्यानंतर मग बांधकाम विभागाची प्रक्रिया सुरू होणार. मग ते खड्डे भरले जाणार. त्यामध्ये विलंब होऊ लागला. अशातच निवृत्तीनंतर त्या जागा पुन्हा नवीन भरती करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. नियमित देखभालीसाठीही विभागाकडे माणसे नाहीत. त्यामुळे मग रस्त्यांची नियमित देखभाल आणि दुरुस्ती होत नाही. परिणामी या रस्त्यांकडे कुणाचेच लक्ष नाही, अशी परिस्थिती दिसते. त्यावर उपाय म्हणून आता ‘वार्षिक देखभाल करार’संकल्पना पुढे आली आहे. लवकरच या कामाच्या निविदा निघणार आहेत.
काय आहे संकल्पना?
जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांची तालुकावर विभागणी करून त्या-त्या रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांचा निविदा काढण्यात येतील. इच्छुक आणि पात्र कंत्राटदारांना निविदेनुसार रस्ता मंजूर करण्यात येईल. त्या रस्त्यावरील तेवढ्या अंतरावरील रस्त्याची दोन वर्षे देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी त्या कंत्राटदारावर राहील. सातत्याने त्या कंत्राटदाराचे त्याला मंजूर रस्त्यावर लक्ष राहणार असल्याने ही देखभाल नीट होईल, अशी अपेक्षा या संकल्पनेमागे आहे.
ही कामे केली जातील
खड्डे भरणे, बाजूपट्ट्यांची दुरुस्ती, गवत काढणे, झाडांच्या वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फांद्या काढणे, गटार काढणे, रस्त्यावर येणाऱ्या पाण्याची निर्गत करणे, पुलाचे तुटलेले रेलिंग बसवणे, कडेची सरकारी झाडे रंगवणे, वाहतुकीच्या नियमनासाठी आवश्यक असे फलक उभारणे ही सर्व कामे या कंत्राटदाराला करावी लागतील.
कामे होतील त्या पद्धतीने तो बिले विभागाकडे सादर करेल व कामाची खातरजमा करून बिले अदा केली जातील.
४८ तासांत खड्डा भरणार
या संकल्पनेच्या माध्यमातून रस्त्यावर खड्डा पडल्यानंतर तो ४८ तासांत भरला जाईल. त्यामुळे खड्डे मोठे होऊन त्याचा वाहतुकीला त्रास होणार नाही, अशी अपेक्षा अधिकारी व्यक्त करत आहेत. दैनंदिन देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर राहणार असल्याने रस्ते नेहमी नीटनेटके राहतील आणि नागरिकांसाठी सोयीचे ठरतील, असाही विश्वास अधिकारी व्यक्त करत आहेत.