मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरील संघर्ष अटळ

By Admin | Published: August 10, 2016 12:46 AM2016-08-10T00:46:31+5:302016-08-10T01:08:05+5:30

नीतेश राणे यांचे आवाहन : उग्र आंदोलनाची तयारी करावी

Road to the Maratha Reservation is inevitable | मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरील संघर्ष अटळ

मराठा आरक्षणासाठी रस्त्यावरील संघर्ष अटळ

googlenewsNext

इचलकरंजी : मराठा आरक्षणाविषयी सध्याच्या शासनाकडून निव्वळ घोषणाबाजीचे गाजर दाखविले जात आहे. आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी रस्त्यावरील संघर्ष अटळ आहे. म्हणून मराठा समाजाने आता आंदोलने उग्र करण्याची तयारी करावी, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी मंगळवारी येथे केले.
येथील युवा मराठा आरक्षण कृती समितीच्यावतीने श्रीमंत घोरपडे नाट्यगृहामध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये आमदार राणे बोलत होते. सुरुवातीला सचिन वरपे यांनी स्वागत केले, तर अमृत भोसले यांनी प्रास्ताविक केले. आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये आमदार राणे यांनी भाजप-शिवसेनेवर घणाघाती टीका केली.
ते म्हणाले, भाजप-सेनेने सत्तेवर येऊन गेल्या दोन वर्षांत मराठ्यांसाठी काय केले, याचा जाब त्यांना विचारावा. परंतु, ते टोपी घालण्यामध्ये पटाईत आहेत. जाब विचारणाऱ्याला गाजर दाखवत ते गप्प बसवितात. त्यामुळे मराठा समाजाने आता पेटून उठले पाहिजे. साम-दाम-दंड-भेद अशा सर्व हत्यारांचा वापर करून आरक्षण मिळविले पाहिजे.
३ आॅगस्टला मुंबईमध्ये मराठा समाजाच्यावतीने आयोजित केलेल्या मोर्चास शासनाने परवानगी नाकारली. शासन मराठा समाजाला दाबून टाकत आहे. मात्र, आता येथून पुढील काळात लाखो लोकांचा मोर्चा मुंबईमध्ये परवाना मिळो ना मिळो काढला जाईल आणि महाराष्ट्रातील मराठ्यांची ताकद दाखविली जाईल.
मेळाव्यातील प्रमुख भाषणामध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण त्यांना मिळाले पाहिजे, असे सांगून इचलकरंजीमधील मलाबादे चौकात धर्मवीर संभाजीराजेंचा पुतळा उभा केला जाईल, याचा पुनर्विचार केला. इंद्रजित सावंत यांनी, सध्याच्या शासनकर्त्यांकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून मराठ्यांचा इतिहास विकृतपणे मांडला जात आहे, असे सांगून टीका केली. यावेळी आरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, मदन कारंडे, माजी आमदार अशोकराव जांभळे, आदींची भाषणे झाली.
मेळाव्यासाठी प्रकाश मोरे, राहुल आवाडे, रवींद्र माने, राजू बोंद्रे, भारत बोंगार्डे, अमरजित जाधव, आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Road to the Maratha Reservation is inevitable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.