कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रस्ता डांबरीकरण जानेवारीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:07 PM2018-12-27T12:07:37+5:302018-12-27T12:09:23+5:30
मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात नेहमीच प्रवासी, व्यावसायिकांची वर्दळ ठरलेलीच. त्यातच बसस्थानकासमोरील रिक्षाथांब्यामागे गेली ११ वर्षे रेंगाळलेल्या रस्त्याचे डांबरीकरण जानेवारी महिन्यात होणार असल्याची कबुली प्रशासनाने दिली. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य उजळले आहे. या रस्त्यासाठी सुमारे साडेआठ लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे.
कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात नेहमीच प्रवासी, व्यावसायिकांची वर्दळ ठरलेलीच. त्यातच बसस्थानकासमोरील रिक्षाथांब्यामागे गेली ११ वर्षे रेंगाळलेल्या रस्त्याचे डांबरीकरण जानेवारी महिन्यात होणार असल्याची कबुली प्रशासनाने दिली. त्यामुळे या रस्त्याचे भाग्य उजळले आहे. या रस्त्यासाठी सुमारे साडेआठ लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे.
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांची नेहमीचीच गर्दी असते. या परिसरात सुमारे २०० हून अधिक व्यावसायिक आहेत. या परिसरात मतदार नसल्याने नेहमीच येथील रस्त्यांची दुरवस्था ठरलेली आहे. गेल्या वर्षी या परिसरातील अनेक रस्त्यांचे डांबरीकरण केले; पण बसस्थानकासमोर रिक्षाथांब्याच्या पिछाडीस असणाऱ्या रस्त्यावरून तुरळक प्रमाणात वाहतूक असली तरी दिवस-रात्र प्रवाशांची पायपीट मोठ्या प्रामाणावर असते. याच रस्त्यात मोठमोठे खड्डे, ड्रेनेजची झाकणे वर आली आहेत.
दाभोळकर चौकातून येणारी वाहतूक बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी प्रतिबंध असल्याने ती पुढे परीख पुलाकडे जाते. त्यामुळे दाभोळकर चौकाकडून येणारी दुचाकी, तीनचाकी अथवा मिनी वाहतूक ही रिक्षाथांब्याच्या पिछाडीच्या रस्त्याचा वापर करून बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडील रस्त्याकडे जाते; पण आता हाच मार्ग खड्डेमय बनला आहे; त्यामुळे लहान वाहनांना त्याचा त्रास होत आहे. त्याबद्दल प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.
या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी महापालिका प्रशासनाने सुमारे साडेआठ लाख रुपये खर्चाची निविदा काढली असल्याने या रस्त्याचे डांबरीकरण येत्या जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे.
या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सुमारे साडेआठ लाख रुपये खर्चाची निविदा काढली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्णत्वानंतर जानेवारी महिन्यात डांबरीकरणाला प्रारंभ होण्याची शक्यता आहे.
- आशिष ढवळे,
स्थायी सभापती, कोल्हापूर महापालिका.