आठवडाभरात रस्त्यांवर पडणार डांबर
By admin | Published: November 6, 2014 12:20 AM2014-11-06T00:20:07+5:302014-11-06T00:39:48+5:30
नगरोत्थानची कामे पुन्हा सुरू : अधिकारी-नगरसेवक व ठेकेदारांंनी कामाचा घेतला आढावा
कोल्हापूर : नगरोत्थान योजनेतील ३९ किलोमीटरचे रस्ते व इतर शासकीय अनुदानातून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे काम ठरलेल्या वेळेत सुरू करण्याचा निर्णय आज, बुधवारी महापालिकेत झालेल्या प्रतिनिधी व अधिकारी व ठेकेदारांच्या बैठकीत झाला. तसेच वेळेत व दर्जेदार काम न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक रकमेसह कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण होते. मुदतीत काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर पाच ते दहा हजार रुपये दरदिवशी दंड ठोठाविला जाणार आहे.
शहरातील ३८.५० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते करण्यासाठी १०८ कोटींच्या निधीची तरतूद करूनही ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने रेंगाळलेला हा प्रकल्प आता पुन्हा सुरू होणार आहे. रखडलेल्या रस्त्यांसाठी चौथ्यांदा काढलेल्या निविदेला ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. लवकरच रस्त्यांचे काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.
साडेतीन वर्षांपूर्वी नगरोत्थान योजनेचा निधी महापालिकेकडे वर्ग होऊनही प्रशासनातील ढिलाईमुळे योजनाच रखडली. त्यानंतर मंजूर झालेल्या रस्त्यांची कामे करण्यात ठेकेदारांनी असमर्थता दर्शविली. निविदा काढूनही ठेकेदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने योजनेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. आता चौथ्या निविदेला प्रतिसाद दिल्याने पुन्हा रस्त्यांचे काम सुरू होणार आहे. कोणते काम कधी सुरू करायचे तसेच रस्त्यांच्या कामाच्या विलंबासाठी प्रतिदिन दहा हजार तर इतर रस्त्यांसाठी पाच हजार दंड ठोठावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. (प्रतिनिधी)
१० ते १५ नोव्हेंबरपर्यंत या रस्त्यांचे काम सुरू
जावळाचा गणपती ते रंकाळा स्टँड
सर्किट हाऊस ते ड्रेनेज प्लँट
वाय. पी. पोवार नगर
राजारामपुरी मेनरोड
स्टेशन रोड
जरगनगर
सेनापती बापट रस्ता विद्यापीठ रोड
कदमवाडी ते भोसलेवाडी चौक
रेणुका मंदिर ते राजर्षी शाहू जन्मस्थळ
साई मंदिर ते फुलेवाडी नाका
फुलेवाडी रिंगरोड
टिंबर मार्केट ते राजक पूर पुतळा, वाशी नाका
यल्लमा मंदिर ते जवाहर नगर
‘लोकमत’चा दणका
शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण झाली आहे. हाडे खिळखिळी करणाऱ्या शहरातील रस्त्यांची सद्य:स्थिती ‘लोकमत’ने ठळकपणे मांडली. गेली दहा दिवस शहरातील रस्त्यांबाबत वस्तुस्थिती सचित्रपणे लोकमत मांडत आहे. त्यामध्ये नागरिकांची भूमिका व त्यांना रस्त्याचा होणारा त्रास याचे विवेचनही केले. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने आज तातडीची बैठक घेत येत्या दहा दिवसांत सर्व रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा फतवा काढला आहे.