नियमांचे काटेकोर पालन करीत रस्ते सुरक्षा सप्ताह वर्षभर राबवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 AM2021-01-19T04:25:25+5:302021-01-19T04:25:25+5:30
कोल्हापूर : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हा उपक्रम फक्त महिन्यापुरता न करता वर्षभर राबवावा. वर्षभर नियमांचे पालन करून अपघातांचे ...
कोल्हापूर : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हा उपक्रम फक्त महिन्यापुरता न करता वर्षभर राबवावा. वर्षभर नियमांचे पालन करून अपघातांचे प्रमाणही कमी झाल्याचे निदर्शनास येईल, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री व परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात नेमके कशामुळे अपघात झाले, ते कशा पध्दतीने कमी करता येतील याचाही अभ्यासपूर्ण अहवाल येत्या पंधरा दिवसांत सादर करावा, असे आदेशही त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले.
कोल्हापुरात प्रादेशिक परिवहन कार्यालयात सोमवारी दुपारी ३२ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते व खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी पोस्टर गॅलरी प्रदर्शन, रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका व स्टीकरचेही अनावरण केले. जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारिस तसेच लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव हे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, गेल्या दहा वर्षांत रस्त्यांचे जाळे वाढले. तसेच त्यावरील वाहनांचा भारही वाढला. देशात रस्ते अपघातांचे प्रमाणाही वाढले आहे. वेगाने नव्हे तर ते नियमबाहय चालविल्यामुळे अपघात वाढल्याची बाब पुढे आली. आरटीओ कार्यालयाने वाहन चालक परवाना देताना त्यातील त्रूटी दूर कराव्यात, असे आवाहन केले. हायवेवरील जिल्ह्यातील ‘ ब्लॅक स्पॉट’ कमी करण्याचे प्रयत्न करू. मोरेवाडी येथे अवजड वाहन तपासणी ट्रॅकला मंजुरी मिळाली असून तो विकसितसाठी १३ कोटी रुपये मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार संजय मंडलिक यांनी, प्रत्येक वाहनाच्या वेगावर नियंत्रण असावे, जिल्ह्यातील प्रत्येक नगरपालिकेच्या ठिकाणी ‘ट्रॅफीक पार्क’ करावे, असे आवाहन केले.
जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, वाहतूक सप्ताहाप्रमाणे नियम वर्षभर पाळावेत. वाहन चालविण्याच्या पध्दतीमुळे अपघात वाढत आहेत, त्यामुळे ड्रायव्हिंग स्कूलमार्फत जास्तीत जास्त लोकांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण द्यावे. प्रादेशिक परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारिस म्हणाले, प्रत्येकाने ओव्हरटेक, ओव्हरस्पीड, ओव्हर लोड, ओव्हर कॉन्फिडन्स हे टाळण्यासाठी प्रयत्न करावा. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही विचार मांडले. लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी, अवजड वाहनांच्या समस्या, महामार्गावर होणारी लूट याबाबत समस्या मांडल्या.
अपघाताचे गूढ
रस्ते सुरक्षा सप्ताह सुरू झाला की त्या पंधरा दिवसांत, महिन्यात अपघातांचे प्रमाण पूर्णपणे कमी होते. त्यानंतर ते पुन्हा वाढते. हे गूढ मला गेली अनेक वर्षे उकललेले नाही. त्यामुळे हा सुरक्षा सप्ताह वर्षभर राबविल्यास अपघाताचेही प्रमाण कमी होईल, असेही पालकमंत्री पाटील म्हणाले.