‘फेरमुल्यांकन’कडून रस्त्याची पाहणी

By admin | Published: May 3, 2015 12:46 AM2015-05-03T00:46:28+5:302015-05-03T00:46:28+5:30

पंधरा दिवसात अहवाल देणार : ‘युटीलिटी’ शिप्टींगचे पैसे वळते करणार : संतोषकुमार

Road Surveys from 'Failing Assessment' | ‘फेरमुल्यांकन’कडून रस्त्याची पाहणी

‘फेरमुल्यांकन’कडून रस्त्याची पाहणी

Next

कोल्हापूर : शहरात आय.आर.बी. कंपनीने कोल्हापुरात एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून तयार केलेल्या रस्त्यांची शनिवारी राज्य रस्ते विकास महामंडळाचे सरव्यवस्थापक तथा फेरमूल्यांकन समितीचे अध्यक्ष संतोषकुमार यांनी या आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह समितीतील सदस्यांनी दिवसभर पहाणी केली. या समितीने शाहू ,शिये, पुईखडी व कळंबा टोल नाका व रस्त्यांची पाहणी केली. हा पहाणी अहवाल १५ दिवसात राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे समितीच्या या अहवालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
आय.आर.बी.ने केलेले रस्ते फेरमूल्यांकनाची मागणी टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीसह लोकप्रतिनिधींनी केली होती.
दरम्यान, आय.आर.बी.ने शहरात ‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ (बीओटी) तत्त्वावर ४९.४९ किलोमीटरचे रस्ते केले. पण, हे रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्याचा शहरवासीयांचा आरोप आहे. याप्रश्नी सातत्याने टोलविरोधी कृती समितीने रान उठविले. रस्त्यांसाठी टोल देण्यास विरोधही केला. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप सरकारने कोल्हापुरातील टोल कोणत्याही स्थितीत घालवू, असे आश्वासन येथील जनतेला दिले होते. तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने यापूर्वी या रस्त्यांसाठी त्रिसदस्य समिती नेमली होती. पण, या समितीने राज्य शासनाकडे दिलेला अहवाल गुलदस्त्यातच राहिला.
दरम्यान, शहरातील रस्त्यांसंदर्भात सत्ताधारी भाजप सरकारने रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती नेमली. या समितीमध्ये कोल्हापूर आर्किटेक्टस अँड इंजिनिअरिंग असोसिएशनचे संचालक वास्तुविशारद राजेंद्र सावंत, समिती सदस्य वास्तुविशारद रामचंदानी, रस्ते विकास महामंडळाचे ओहोळ व साहाय्यक कार्यकारी संचालक प्रकाश खेमचंदानी यांचा समावेश आहे. शनिवारी संतोषकुमार यांच्यासमवेत आयुक्त पी. शिवशंकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता शिंदे, एन. आर. भांबुरे, मूल्यांकन करणाऱ्या एजन्सीचे अमित सणगर, आदी समिती सदस्यांनी शिये, शाहू, शिरोली या टोलनाक्यांवर तसेच महावीर उद्यान, कसबा बावड्याचा मुख्य रस्ता, ताराबाई पार्क येथील पितळी गणपती, सायबर चौक, शाहू मिल, लक्ष्मीपुरी-उमा टॉकीज रस्ता, दसरा चौक, रंकाळा रस्ता (डी मार्टशेजारील), रंकाळा टॉवर ते तांबट कमान, पुईखडी, कळंबा, रेसकोर्स नाका, आयसोलेशन हॉस्पिटल, राजेंद्रनगर रिंग रोड, राजाराम महाविद्यालय येथे पाहणी केली. यामध्ये भुयारी गटार, पदपथ, पथदिवे, रस्त्यांचा दर्जा यांची पाहणी केली.
समिती सदस्य देणार १३ मेपर्यंत अहवाल
कोल्हापुरात शनिवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक तथा फेरमूल्यांकन समितीचे अध्यक्ष संतोषकुमार यांना समितीतील अन्य सदस्य व पुणे येथील या रस्त्याचे मूल्यांकन तपासण्यासाठी नेमलेली एजन्सी स्वतंत्र अहवाल देणार आहे. आज एकाच दिवशी पाहणी करून संतोषकुमार मुंबईला रवाना झाले. त्यांनी १३ मेपर्यंत या सदस्यांना अहवाल देण्याचे सांगितले आहे.
नागरिकांची मतेही जाणून घेण्याची गरज
शहरात समितीने रस्त्याची व टोलनाक्यांची पाहणी केली; पण तिने रस्त्यांसंदर्भात एकाही नागरिकाकडून मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला नसल्याचे दिसते. अगोदरच वादग्रस्ततेत अडकलेल्या या रस्ते प्रकल्पामुळे शहरवासीयांत संतापाची लाट आहे. त्यामुळे समितीने रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल शनिवारी नागरिकांची मतेही जाणून घेणे गरजेचे होते.

Web Title: Road Surveys from 'Failing Assessment'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.