कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कामे सुरू होणार
By admin | Published: November 18, 2014 10:53 PM2014-11-18T22:53:26+5:302014-11-18T23:32:05+5:30
नगरोत्थान योजना : डिसेंबरअखेर कामे पूर्ण होणार, गळती काढण्याचे काम अंतिम टप्प्यात
कोल्हापूर : खराब रस्त्यांतून शहरवासीयांची सुटका होण्याची वेळ आली आहे. ठेकेदारांनी चुकीमुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. उद्या, बुधवारपासून १५० हून अधिक लहान-मोठे रस्ते व नगरोत्थान योजनेतील रखडलेल्या कामांची सुरुवात केली जाणार आहे. रस्त्यावरील गळती काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबरअखेर सर्व रस्ते चकचकीत करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी ‘लोकमत’ला दिली.
नगरोत्थान योजनेतील ३९ किलोमीटरचे रस्ते व इतर शासकीय अनुदानातून करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे काम वेळेत व दर्जेदार न करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक रकमेसह कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे. मुदतीत काम सुरू न करणाऱ्या ठेकेदारांवर पाच ते दहा हजार रुपये दरदिवशी दंड ठोठावण्यात येणार असल्याने सर्व्हे, गळती काढणे, टेस्ट रिपोर्ट, आदी तांत्रिक बाबींची पूर्तता अंतिम टप्प्यात आहे. अनेक ठेकेदारांनी खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
शहरातील ३८.५० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते करण्यासाठी १०८ कोटींच्या निधीची तरतूद करूनही ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने रेंगाळलेला हा प्रकल्प २५ नोव्हेंबरपर्यंत सुरू होणार आहे. कामात अडथळा आणणाऱ्या नगरसेवकांवर थेट फौजदारी दाखल करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्याने रस्त्यांचे काम वेळेत व दर्जेदार होईल, अशी नागरिकांना आशा आहे. (प्रतिनिधी)
कामाचा दिखावा नको
राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून दिलेल्या निकषांप्रमाणेच रस्ते झाले पाहिजेत, असा दंडक आहे. मात्र, शहरात महापालिकेने करूनही वेळेअगोदर खराब झालेल्या मोठ्या रस्त्यांची संख्या फक्त आठ आहे. उर्वरित खराब असलेले रस्ते ‘सार्वजनिक’नेच केले आहेत. कोणत्याही प्रकारचा डांबरी रस्ता किमान पाच वर्षे टिकलाच पाहिजे, असा दंडक आहे. रस्त्यांच्या डागडुजीची जबाबदारी पहिली दोन वर्षे ठेकेदाराची असते. खडीचे अयोग्य प्रमाण, रोलिंग व डांबराचा अभाव, रस्त्याची असमान पातळी यांमुळे शहरातील रस्त्यांना एका पावसातच घरघर लागली. डांबर-खडीची पावडर-लाली लावून रस्ता केल्याचा दिखावा के ला जात आहे. ‘निव्वळ पैसे कमावण्यासाठी रस्ते’, ही संस्कृती वाढल्यानेच ‘या रस्त्यांखाली दडलंय काय?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती बदलण्याची नागरिकांनीच सजगता दाखवीत तक्रारीसाठी वृत्तपत्रे तसेच महापालिका यांच्याकडे जाण्याची गरज आहे.
खराब रस्त्यांसाठी ठेकेदार व अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. सर्व कनिष्ठ व उपअभियंत्यांद्वारे रस्त्याच्या कामांवर लक्ष ठेवून दर दोन दिवसांनी अहवाल घेण्यात येणार आहे. अडथळा आणणाऱ्यांवर थेट फौजदारीची तयारी प्रशासनाने केली आहे. कामाच्या दर्जाबाबत काही शंका असल्यास नागरिकांनी तत्काळ महापालिका प्रशासनाची संपर्क साधावा.
- नेत्रदीप सरनोबत
(शहर अभियंता)
कोट्यवधींचा निधी खड्ड्यात नको
डांबरी रस्त्यावर दोन थर अंथरून कारपेट पद्धतीने केलेला रस्ता किमान पाच वर्षे व कमाल सात वर्षे तरी टिकला पाहिजे, असा दंडक आहे. मात्र, ठेकेदारांनी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या संगनमताने चालुगिरी केल्याने कोट्यवधींचा निधी खड्ड्यांत जात आहे. आता पुन्हा रस्त्यांसाठी मोठा निधी खर्च केला जाणार आहे. निधी खड्ड्यात घालू नका, अशी अपेक्षा तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
४सेनापती बापट रोड ते वास्कर बंगला, मार्केट यार्ड चौक ते जाधववाडी-कदमवाडी-भोसलेवाडी चौक, शेतकरी पंप ते लोणार वसाहत, मध्यवर्ती इमारत ते लाईन बझार-भगवा चौक, रेणुका मंदिर ते राजर्षी शाहू जन्मस्थळ, राजारामपुरी मुख्य रस्ता, मध्यवर्ती बसस्थानक-परिख पूल या रस्त्याचे काम नगरोत्थान योजनेंर्तगत सुरू करण्यात आले आहे.
हे रस्ते होणार चकाचक
जावळाचा गणपती ते रंकाळा स्टँड
सर्किट हाऊस ते ड्रेनेज प्लँट
वाय. पी. पोवारनगर
राजारामपुरी मेन रोड
स्टेशन रोड
जरगनगर
सेनापती बापट रस्ता,
विद्यापीठ रोड
कदमवाडी ते भोसलेवाडी चौक
रेणुका मंदिर ते शाहू जन्मस्थळ
साई मंदिर ते फुलेवाडी नाका
रिंग रोड
टिंबर मार्केट ते राजक पूर पुतळा
यल्लम्मा मंदिर ते जवाहरनगर
कोल्हापुरात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी मंगळवारी रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. यावेळी कार्यकारी अभियंता एम. एम. निर्मळे, एन. एस. पाटील, सुरेश पाटील यांच्यासह ठेकेदार उपस्थित होते.