स्वच्छता चळवळीतून रस्ते, मैदाने चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:29 AM2019-06-03T00:29:06+5:302019-06-03T00:29:10+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये स्वच्छता मोहिमेची चळवळ सुरू झाली असून, रविवारी सकाळी लोकसहभागातून शहराच्या विविध भागांत तसेच नाल्यांत महास्वच्छता ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये स्वच्छता मोहिमेची चळवळ सुरू झाली असून, रविवारी सकाळी लोकसहभागातून शहराच्या विविध भागांत तसेच नाल्यांत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानामध्ये ‘क्रिडाई’सह स्वयंसेवी, सेवाभावी संस्था, दिव्यांगबांधव, कृती समिती, तरुण मंडळे, तालीम संस्था, सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी आठ जे.सी.बी. आणि १५ डंपरद्वारे एकूण २० डंपर गाळ व कचरा गोळा करण्यात आला. मोहिमेकरिता महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काम पाहिले.
सकाळी दसरा चौकानजीक करवीर पंचायत समिती कार्यालयाजवळ महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या मोहिमेस प्रारंभ झाला. या मोहिमेत नगरसेवकांसह माजी नगरसेवक, अधिकाऱ्यांसह नागरिकांनी श्रमदानासाठी लोकसहभाग दर्शविला. या चळवळीला यश येत असून, रविवारच्या महास्वच्छता मोहिमेला चांगलेच यश मिळाले. यापूर्वी नालेसफाईची मोहीम हाती घेण्यात आली होती; पण रविवारी नाल्यांसह शहर आणि उपनगरांतील अनेक उद्याने, मैदाने, रस्ते, फूटपाथवरील खुरटे गवत, कचरा कोंडाळे इथेही स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी नगरसेवकांसह नागरिकही पुढे आले. जयंती नाला, रंकाळा तलाव, श्याम सोसायटी येथील नाल्यातील गाळ जेसीबी मशीनद्वारे काढण्यात आला.
अधिकाºयांसह लोकप्रतिनिधींनीही हातात झाडू घेऊन या स्वच्छता मोहिमेत उत्साहाने सहभाग घेतला. टोलविरोधी कृती समितीनेही या मोहिमेत सहभाग नोंदविला.
यावेळी प्रभाग समितीचे सभापती शोभा कवाळे, राजसिंह शेळके, गटनेता विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, नगरसेविका अर्चना पागर, कविता माने, उमा बनछोडे, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, संजय मोहिते, ईश्वर परमार, माजी नगरसेवक विनायक फाळके, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक आयुक्त संजय सरनाईक, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहायक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, आर. के. जाधव, एस. के. माने, हर्षजित घाटगे, एलबीटी आॅफिसर सुनील बिद्रे, इस्टेट आॅफिसर प्रमोद बराले, परवाना अधीक्षक राम काटकर, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक मदन चव्हाण, दुर्वास कदम, अनंत खासबारदार, उदय गायकवाड, दिलीप देसाई, कॉ. दिलीप पोवार, निवासराव साळोखे, केएमसी कॉलेजचे प्रकाश टिपुगडे, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, अधिकारी, ‘क्रिडाई’चे पदाधिकारी, स्वरा फौंडेशनचे कार्यकर्ते, महापालिकेच्या सर्व विभागांकडील कर्मचारी, आरोग्य विभागाकडील ३०० कर्मचारी, अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते व नागरिक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
दिव्यांग बांधवांनी
वेधले लक्ष
महास्वच्छता अभियानामध्ये दसरा चौकनजीक दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदविला. त्यांच्या सहभागाचे अनेकांनी कौतुक केले. त्यांनी अनेकांना लाजवेल अशा पद्धतीने स्वच्छता मोहिमेत काम करून दाखविले. त्यामुळे त्यांनी वाहवा मिळविली.