रस्ते बनले मृत्यूचे सापळे
By Admin | Published: July 29, 2016 09:11 PM2016-07-29T21:11:55+5:302016-07-29T23:29:34+5:30
सातेरी-महादेव परिसर : संरक्षण कठड्यांची अवस्था बिकट
शिवराज लोंढे -- सावरवाडी --ऐतिहासिक वारसा जपलेल्या सातेरी-महादेव (ता. करवीर) पश्चिम पर्यटनक्षेत्रातील रस्त्यांची सध्या अवस्था दयनीय बनली आहे. नागमोडी वळणाचे रस्ते मृत्यूचे सापळे बनू लागले आहेत.
करवीर तालुक्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर टाकणाऱ्या सातेरी-महादेव डोंगरी भागातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. राज्य शासनाने पर्यटन केंद्र म्हणून दर्जा दिलेल्या या परिसरात सध्या वाहतूक वाढत आहे. सातेरी-महादेव ही दोन प्राचीन मंदिरे आहेत. या डोंगरी भागात तीन बाजूंनी नागमोडी वळणाचे रस्ते आहेत. शासकीय निधीअभावी व पावसाचे प्रमाण जादा असल्यामुळे रस्ते खराब होत असतात. दऱ्या-खोऱ्यातून जाणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा असणारे संरक्षण कठडे कोसळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. घाटातील रस्त्यांचे गेल्या २0 वर्षांपासून रुंदीकरणाचे काम झालेले नाही. दुहेरी वाहतुकीची सोय नाही. रस्त्याचे रुंदीकरण झाले नसल्यामुळे, घाटातून जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना वाहने चालवावी लागतात. रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठे दगड असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते.
करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील घाटमाथ्यावरील या डोंगरी भागात सध्या पर्यटकांची संख्या
दिवसेंदिवस वाढत आहे. दर सोमवारी महादेव मंदिराशेजारी मोफत अन्नदान केंद्र उभारले आहे. हजारो भाविकांची वाहनांसह याठिकाणी गर्दी होते. भक्तनिवासस्थानाजवळ वाहनांना थांबण्यासाठी अपुरी जागा आहे. नागमोडी वळणावरील रस्त्यावर मोरीचे बांधकाम रखडले आहे. पावसामुळे रस्ते खराब होऊ लागल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. धोंडेवाडी गावनजीक जाणाऱ्या घाटातील रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. दऱ्या-खोऱ्यातून हा रस्ता सातेरी-महादेव मंदिराकडे जातो. या स्थळावरून वाहतूक करणे धोकादायक बनले आहे.
ट्रक, एसटी वाहतूक कठीण बनली आहे. गेल्या वीस वर्षांपासून घाटातील रस्त्याचे रुंदीकरण केलेले नाही. डोंगरी भागातील मुख्य वाहतुकीचे रस्ते दुरुस्त करणे, घाटातील मुख्य रस्त्यांचे त्वरीत रुंदीकरण करणे, मुख्य वळणावर दिशादर्शक फलक लावणे, वळणावर गतीरोधकांची उभारणी करणे ही काळाची गरज आहे.
यासाठी शासकीय निधीची तरतूद करणे गरजेचे आहे. ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून दळणवळणाचा प्रश्न निकालात काढणे गरजेचे आहे.
सातेरी-महादेव डोंगरी भागातील घाटातील रस्त्यांचे नव्याने रुं दीकरण करणे गरजेचे आहे. रस्त्यांच्या संरक्षण कठड्याच्या बांधकामाकडे लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने निधी मंजूर करावा.
-मुकुंद पाटील, राष्ट्रीय समाज पक्ष,
कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष
घाटमाथ्यातील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम त्वरीत सुरु करणे गरजेचे आहे. डोंगरी भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नव्या लढ्याची आवश्यकता आहे. शासकीय जादा निधीसाठी जनआंदोलन छेडू.
- वैशाली नलवडे, ग्रा.पं. सदस्य.
भारतीय महिला फेडरेशन, सदस्य.