कोल्हापुरातील रस्ते बनले जीवघेणे; महापालिका अधिकाऱ्याच्या आईचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 01:51 PM2022-10-29T13:51:13+5:302022-10-29T13:51:42+5:30
कोल्हापूर : कणेरकरनगरातील महिला भोवळ येऊन रस्त्यावर पडल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना दि. ११ ऑक्टोबरला घडली; परंतू दुचाकीवरुन ...
कोल्हापूर : कणेरकरनगरातील महिला भोवळ येऊन रस्त्यावर पडल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना दि. ११ ऑक्टोबरला घडली; परंतू दुचाकीवरुन जात असताना दुचाकी खड्ड्यात आदळल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा संशयही व्यक्त होत आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडे कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीस असलेले जयेश जाधव हे त्यांची आई वैशाली प्रतापराव जाधव (वय ५९) यांच्यासह दुचाकीवरून निघाले होते. वैशाली यांना कमी रक्तदाबाचा त्रास होता. गाडीवरून जाताना त्यांना भोवळ आल्यासारखे झाले म्हणून जयेश यांनी गाडी थांबविली. त्यावेळी त्या गाडीवरुन खाली पडल्या आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली, तसा जबाब जुना राजवाडा पोलिसांत जयेश यांनी त्याचवेळी नोंदविला. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना वैशाली यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
उत्तरकार्याचा विधी झाल्यानंतर सोशल मीडियावर शुक्रवारी जाधव यांचा मृत्यू रस्त्यातील खड्ड्यांमुळेच झाल्याची बातमी व्हायरल झाली. त्यामुळे पोलीस, महानगरपालिका यंत्रणा खडबडून जागी झाली. जयेश जाधव यांना पोलीस ठाण्यात येण्याचा निरोप पोलिसांतर्फे देण्यात आला. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. एस. पाटील यांनी त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली. जेथे ही महिला पडली त्या परिसराची पाहणी केली. पोलीस रेकॉर्डवर खड्ड्यामुळे पडल्याने मृत्यू झाल्याचे आले नसले तरी त्या परिसरात रस्त्याला मोठ मोठे खड्डे असल्याचे वास्तव आहे. जाधव हे महापालिकेच्याच पाणीपुरवठा विभागात काम करतात. त्यामुळे त्यांनाच महापालिकेच्या यंत्रणेच्या विरोधात भूमिका घेण्यास अडचणी आल्याने त्यांच्या आईचा मृत्यू हा भोवळ येऊन पडल्याने झाला असे कारण त्यांनी दिले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जीव जावा असेच रस्ते..
कोल्हापूर शहरातील रस्त्यांची स्थिती ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांचीच नव्हे तर कुणाचीही आई गाडीवरून पडून गतप्राण होईल अशीच आहे. पावसाळ्यात घाईगडबडीत केलेल्या रस्त्यांची खडी पुरती उखडली आहे. या अपघातानंतर शुक्रवारपासून रस्त्याच्या पॅचवर्कचे काम तातडीने सुरू झाले हा योगायोग नव्हे तर त्याचा परिणामच असावा, असेही म्हटले जात आहे.