कर्नाटकातील रस्ता लय भारी! कोगनोळी ते हुबळी । दर्जेदार सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:38 PM2019-11-16T23:38:35+5:302019-11-16T23:41:30+5:30
गेली १४ वर्षे या रस्त्यावरून प्रवाशांना डोळे झाकून महाराष्ट्राचा महामार्ग कुठे संपला आणि कर्नाटकमधील महामार्ग सुरू झाला हे सांगता येईल, अशा पद्धतीने कामकाज कर्नाटकमध्ये करण्यात आले आहे. याच फरकाची गेली अनेक वर्षे वाहनधारकांमध्ये चर्चा सुरू असून, दोन राज्यांतील महामार्गामध्ये एवढा फरक कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
समीर देशपांडे।
कोल्हापूर : पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्गावरील कोगनोळी ते हुबळी दरम्यानचा प्रवास हा आनंददायी होतो. रस्त्याचा सर्वोकृष्ट दर्जा, दर्जेदार सुविधा, सर्वसोयींनीयुक्त टोलनाके, पार्किंगची व्यवस्था, नियमित देखभाल यामुळे प्रवाशांना परदेशातील प्रवासाची अनुभूती येते. कर्नाटकातील रस्ते पाहिल्यानंतर महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकातील रस्ता ‘लय भारी’ हे शब्द आपसूकच तोंडातून बाहेर पडतात.
गेले सहा दिवस ‘लोकमत’ने पुणे ते कागल या महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था, दर्जाहीन कामे, भरमसाट टोल आणि महामार्गावर पूरक सुविधांचा अभाव यांची सविस्तर मांडणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या पुढे कर्नाटकची हद्द सुरू होते. येथील कोगनोळीपासून काकतीपर्यंतचा ७७ किलोमीटरचा रस्ता पुंज लॉएड कंपनीच्यावतीने करण्यात आला आहे. मात्र, गेली १४ वर्षे या रस्त्यावरून प्रवाशांना डोळे झाकून महाराष्ट्राचा महामार्ग कुठे संपला आणि कर्नाटकमधील महामार्ग सुरू झाला हे सांगता येईल, अशा पद्धतीने कामकाज कर्नाटकमध्ये करण्यात आले आहे. याच फरकाची गेली अनेक वर्षे वाहनधारकांमध्ये चर्चा सुरू असून, दोन राज्यांतील महामार्गामध्ये एवढा फरक कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
- कोगनोळी टोलनाक्याच्या आधीपासून कर्नाटकची हद्द सुरू होते. येथून पुढे ७७ किलोमीटरपर्यंत आपण एका आनंददायी प्रवासाचा अनुभव घेतो. याची सध्या देखभालही याच कंपनीकडे आहे.
- काम पाहिल्यानंतर कामाचा दर्जा दिसलाच पाहिजे, अशा पद्धतीचे काम या मार्गावर झाले आहे. सिमेंटच्या रस्त्याचेही काम उत्तम दर्जाचे करण्यात आले होते. आता तर केंद्र शासनाच्या नव्या निर्देशानुसार या ठिकाणी पुन्हा डांबराचा एक थर देण्यात येत आहे.
- या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला जे सेवारस्ते आहेत, तेदेखील तितकेच दर्जेदार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील राज्यरस्त्यांच्या दर्जाचे हे सेवा रस्ते तयार करण्यात आले आहेत. जेथे मध्ये चौक तयार करण्यात आले आहेत, तिथे अपघातांची शक्यता वाढल्याने येथून प्रवेश बंद करण्यात आले आहेत. सेवा रस्त्यांच्या आजूबाजूला घळघळीत जागा सोडल्याने वाहनधारकांना कुठेही अडचण होत नाही.
- रस्त्याच्या मधील भाग खचला, खड्डे पडले तरीही त्या ठिकाणी तातडीने तो भाग बंद करणे, पर्यायी मार्गाने वाहतूक वळविणे, युद्धपातळीवर दुरुस्ती करणे ही कामे सातत्याने या मार्गावर सुरू असतात. रस्त्याच्या मध्ये छान फुलझाडे आहेत. त्यांना वेळेत पाणी घातले जाते. पावसाळ्यात बेसुमार वाढलेली झाडे नियमितपणे छाटली जातात. महामार्गाच्या दोन्ही बाजूंचे गवतही नियमित कापले जाते. गवत खाण्यासाठी जनावरे रस्त्यावर येण्याची शक्यता असते; म्हणून ही दक्षता घेतली जाते.
सेवेसाठी तीन डॉक्टर्स
पुंज लॉएड कंपनीकडे या ७७ किलोमीटरच्या रस्त्याची देखभाल असल्याने त्यांनी या मार्गावर अपघात झाल्यास रुग्णवाहिका, तीन डॉक्टर्स २४ तास उपलब्ध ठेवले आहेत. अपघातग्रस्त वाहने हटविण्यासाठी क्रेन आहे. अपघातग्रस्तांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी आवश्यक वाहने आहेत. या सर्वांशी संपर्क साधण्यासाठी ठिकठिकाणी फोन क्रमांक दिले आहेत.
महामार्गावर १३५ ठिकाणी शौचालये
कर्नाटकातील या ७७ किलोमीटर्सच्या महामार्गावर येता-जाता १३५ ठिकाणी शौचालये आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी रोज चार टॅँकर कार्यरत आहेत. मार्गावरील सर्व झाडांना पाणी घालणे, शौचालये आणि पिण्याचे पाणी भरणे हे काम रोज सुरू असते.
आवश्यक ठिकाणी पार्किंगसाठी जागा सोडणे, आवश्यक त्या ठिकाणी मोठमोठे सूचनाफलक लावणे या सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने या कंपनीने केल्याचे स्पष्टपणे या मार्गावर दिसून येते.
आवश्यक त्या ठिकाणी कंपनीच्या कार्यालयांचे फोन नंबर्स ठळक आकड्यांमध्ये देण्यात आले आहेत. यातील अनेक गोष्टी सातारा ते कोल्हापूर या मार्गावर दिसत नाहीत.
राष्ट्रीय महामार्ग - ४ कोगनोळी ते काकती 7 7 कि.मी.
काम सुरू २00१
काम संपले जून २00४
पुन्हा डांबरीकरण २00९/१४/१९
दुतर्फा लावलेली झाडे १५,५३0
दुभाजकातील झाडे ४२,२७६
डाव्या बाजूचे फलक ३५८
उजव्या बाजूचे फलक ३२९
हेल्पलाईन फलक प्रति ५ कि.मी.