रस्ते, पाण्यासाठी रास्ता रोको इचलकरंजीत नागरिक संतप्त : नगराध्यक्षांना घेराव, काही काळ तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:52 PM2017-12-18T23:52:05+5:302017-12-18T23:53:22+5:30
इचलकरंजी : येथील विक्रमनगरमधील आरगे भवन व इंदिरानगर परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, अशा नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे स्थानिक संतप्त नागरिकांनी सोमवारी थोरात चौकात उत्स्फूर्तपणे रास्ता
इचलकरंजी : येथील विक्रमनगरमधील आरगे भवन व इंदिरानगर परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, अशा नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे स्थानिक संतप्त नागरिकांनी सोमवारी थोरात चौकात उत्स्फूर्तपणे रास्ता रोको केला. सुमारे अर्धा तास झालेल्या या आंदोलनानंतर आंदोलक नगरपालिकेत गेले आणि त्यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना घेराव घातला. यावेळी त्यांच्या दालनातच ठिय्या मारल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
विक्रमनगर परिसरातील इंदिरानगर, आरगे भवन या परिसराबरोबर शांतीनगर येथील नागरी वसाहतीतील रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्याचबरोबर नळाला दूषित पाणी येत असून, काही ठिकाणी पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. याबाबत नगरपालिकेकडे वारंवार मागणी करूनसुद्धा दुर्लक्ष होत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी नगरसेवक महेश कांबुरे, माजी नगरसेवक श्रीरंग खवरे यांच्यासह सोमवारी थोरात चौकात रास्ता रोको केला.
आंदोलनामुळे या प्रमुख मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यामुळे आंदोलकांनी आपला मोर्चा नगरपालिकेकडे वळविला.आंदोलक थेट नगराध्यक्षा स्वामी यांच्या दालनात आले. महिला-पुरुष आंदोलकांनी नगराध्यक्षांना घेराव घालून त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले. दरम्यान, उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, मुख्याधिकारी
डॉ. प्रशांत रसाळ, जलअभियंता सुरेश कमळे, नगर अभियंता बापूसाहेब चौधरी, आदी नगराध्यक्षांच्या दालनात आले. आंदोलकांनी त्यांनाही धारेवर धरले. अखेर संबंधित कंत्राटदाराकडून सुमारे महिन्याभरात रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येईल आणि दरम्यानच्या काळात पाणीपुरवठा सुस्थितीत आणण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे आंदोलन संपुष्टात आले.
इचलकरंजीत नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्यासमोर नागरिकांची कैफियत मांडली. यावेळी माजी नगरसेवक श्रीरंग खवरे, नगरसेवक तानाजी पोवार, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे, जलअभियंता सुरेश कमळे, भाऊसाहेब आवळे, महेश कांबुरे, नितीन पाटणी, नगरअभियंता बापूसाहेब चौधरी आंदोलक उपस्थित होते.