काँगे्रस-राष्ट्रवादीत रुसवे-फुगवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:28 AM2019-04-05T00:28:23+5:302019-04-05T00:28:28+5:30

संजय पारकर । लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : लोकसभा निवडणुकीसाठी एकाच दिवशी झालेला प्रा. संजय मंडलिकांचा तुरंबे येथील प्रचार ...

Roceway-Phugway in Congress-NCP | काँगे्रस-राष्ट्रवादीत रुसवे-फुगवे

काँगे्रस-राष्ट्रवादीत रुसवे-फुगवे

Next

संजय पारकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राधानगरी : लोकसभा निवडणुकीसाठी एकाच दिवशी झालेला प्रा. संजय मंडलिकांचा तुरंबे येथील प्रचार प्रारंभ व खासदार धनंजय महाडिक यांच्या राधानगरीतील काँगे्रसच्या मेळाव्याने राधानगरी तालुक्यात निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंग भरू लागला आहे. विस्ताराने सर्वांत मोठा तालुका व प्रादेशिक असंलग्नता यामुळे थेट जनतेशी संपर्क साधणे उमेदवारांना केवळ अशक्य आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांवरच त्यांना अवलंबून राहावे लागते.
उमेदवार निश्चित झाले असले तरी अनेक स्थानिक नेत्यांचे अजून ठरलेले नाही. विशेषत: काँगे्रस-राष्ट्रवादीतील रुसवे-फुगवे अजून दूर झालेले नाहीत. यामुळे गतवेळी मिळालेले २० हजारांचे मताधिक्य टिकविण्याचे मोठे आव्हान खासदार महाडिक यांच्यासमोर आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी व शिवसेना-भाजप युती यांच्यातच लढत होणार आहे. आजमितीला स्थानिक परिस्थिती पाहता वरवर तरी आघाडीची स्थिती मजबूत दिसते. मात्र, आघाडीतील अनेकांची मदत युतीला होणार आहे. गतवेळी अनेकांनी अंतर्गत अशी मदत केली होती. यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या महाडिक विरोधातील उघड भूमिकेमुळे दूधगंगा काठावरील वजनदार नेते विजय मोरे, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले, मारुतीराव जाधव यांच्यासह अनेकांनी मंडलिक यांच्या मागे ताकद लावली आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा हा तालुका. ते जिल्ह्यात सक्रिय आहेत. उमेदवार त्यांच्या पक्षाचा आहे तरीही तालुक्यातील राष्ट्रवादीत अजून सामसूमच आहे. पक्षात एकमुखी वर्चस्व असलेल्या पाटील व माजी आमदार के. पी. पाटील यांचे जावई व ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यात दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या सुप्त संघर्षाला पक्षाला दुफळीचे ग्रहण लागले आहे. याचा हा परिणाम असावा. तरीही आगामी विधानसभेची गणिते पाहून अपवाद वगळता संपूर्ण राष्ट्रवादी महाडिक यांच्या बाजूने राहील असे दिसते.
मोठी ताकद असलेली व गटातटात विभागलेली काँग्रेस कधीच एकत्र येत नाही, अशी आजवरची स्थिती आहे. ही निवडणूकही त्याला अपवाद नाही. प्रामुख्याने काँगे्रसचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली येथील काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. भोगावती कारखाना व जुना सांगरूळ विधानसभा मतदारसंघ यामुळे त्यांचा शब्द येथे प्रमाण आहे. ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदय पाटील व सर्व संचालक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले, ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुप्रिया साळोखे, राजाराम साखरचे माजी संचालक सुधाकर साळोखे, एल. एस. पाटील, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे यांच्यासह त्यांना मानणारे अनेकजण महाडिक यांच्यासाठी सक्रिय झाले आहेत. महाडिक यांना मानणारे ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, राजाराम कारखान्याचे माजी अध्यक्ष दत्तात्रय निल्ले, संचालक राजाराम मोरे, के. पी. चरापले व युवाशक्तीचे कार्यकर्ते प्रचारात असून, त्यांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.
काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती अभिजित तायशेटे यांची भूमिका अजून जाहीर नाही. मात्र, त्यांची मदत मंडलिक यांना होण्याची शक्यता आहे. काही गावांतून ताकद टिकवून असलेल्या जनता दलाची भूमिकाही जाहीर नाही. त्यांचे नेते विठ्ठलराव खोराटे पालकमंत्री चंद्र्रकांत पाटील यांच्या मदतीने बिद्री कारखान्यात सत्तेत आहेत. त्यामुळे हा पक्ष याची परतफेड करणार की पुरोगामी म्हणून काँग्रेस आघाडीबरोबर राहणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मर्यादित अस्तित्व असलेला शेकाप आघाडीबरोबर राहील.
मागील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना देशातील मोदी लाटेचा मोठा फायदा झाला होता. फार मोठी साथ नसतानाही ते फक्त वीस हजारांनी मागे राहिले. यावेळी मोदी लाट नाही. मात्र, त्यानंतर आमदार प्रकाश आबिटकर यांच्या संपर्क व कामांचा त्यांना फायदा होईल का, हा पाहावे लागेल. सतेज पाटील यांच्यामुळे मोठी कुमक जोडीला आहे. भाजपची ताकद मर्यादित आहे. युती होण्यापूर्वी आमदार आबिटकर यांना त्यांचा मोठा विरोध होता. मात्र, आता भाजपचे कार्यकर्तेही मंडलिक यांचा प्रचार करतात.
खासदार धनंजय महाडिक यांना गेल्यावेळी येथे २० हजार मताधिक्य मिळाले होते. संपर्क राखण्यात ते कमी पडले, शिवाय लोकांची अपेक्षित कामेही झालेली नाहीत. याबरोबर महाडिक यांच्या जिल्ह्यातील राजकीय भूमिकेमुळे मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. निवडणूक लोकसभेची असली तरी अनेकांचे मनसुबे विधासभेचे आहेत. पुढील काळात होणारी ‘गोकुळ’ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही डावपेच आखले जात आहेत.

Web Title: Roceway-Phugway in Congress-NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.