चंदन दरोड्याचा छडा; दोघे ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 01:31 AM2017-07-28T01:31:30+5:302017-07-28T01:33:47+5:30
कोल्हापूर/ सोलापूर : सोनतळीजवळील वनखात्याच्या चिखली रोपवाटिकेवर पडलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात कोल्हापूर पोलिसांना यश मिळाले आहे. दरोड्यातील रक्तचंदनाचे ५० लाखांचे लाकूड पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे गुरुवारी सापडले आहे.
कोल्हापूर/ सोलापूर : सोनतळीजवळील वनखात्याच्या चिखली रोपवाटिकेवर पडलेल्या दरोड्याचा छडा लावण्यात कोल्हापूर पोलिसांना यश मिळाले आहे. दरोड्यातील रक्तचंदनाचे ५० लाखांचे लाकूड पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे गुरुवारी सापडले आहे. या प्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी सांगली येथील १०० फुटी रोड, वाळवा तालुक्यातील मच्छिंद्रगड आणि पंढरपूर तालुक्यातील आढीव व रोपळे येथे छापे टाकून युनूस आणि अकबर या दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते.
गेल्या मंगळवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास कोल्हापूर ते पन्हाळा मार्गावरील सोनतळीजवळील वनखात्याच्या चिखली रोपवाटिकेवर दरोडा टाकून चोरट्यांनी सुमारे पाऊण कोटींचे चंदन तेल, रक्तचंदन लाकूड व चंदनाचे लाकूड चोरून नेले होते. तेथील दोन वन कर्मचाºयांसह तिघाजणांना बांधून घालून चोरट्यांनी ही लूट केली होती. या दरोड्यात सुमारे आठ ते नऊजणांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी पाच संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर पोलिसांनी सांगलीतील १०० फुटी रस्ता, मच्छिंद्रगड (ता. वाळवा) व पंढरपूर तालुक्यातील आढीव या तीन ठिकाणी छापे टाकले.
त्यानुसार सोलापूर पोलिसांच्या मदतीने कोल्हापूर पोलिसांनी पंढरपूर येथे जाऊन तपास केला. पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे बुधवारी (दि. २६) पहाटेच्या सुमारास पोलिसांनी चंदनचोरी प्रकरणातील दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर पोलिसांनी आढीव (ता. पंढरपूर) येथे शेतातून सुमारे ५० लाखांचे चंदन जप्त केल्याचे समजते. चौकशीत अनेक मोठ्या चंदन तस्करांची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्या आधारे तपासाची चक्रे फिरली.
सूत्रधारासह आणखी संशयित फरार
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते, सपोनि संजीव झाडे यांच्यासह सहाजणांचे पथक पंढरपूर येथे मंगळवारपासून तळ ठोकून होते. बुधवारी मध्यरात्री रोपळे (ता. पंढरपूर) येथून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशीतून या दरोड्याचा सूत्रधार कोण हे समजेल असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
पथक मुंबई, शिमोगाकडे
संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार या दरोड्यातील सुमारे ६० लाखांचे चंदन तेल सागरी मार्गाने परदेशात पाठविले जात असल्याचे समजल्याने पोलिसांची तपास पथके तातडीने मुंबई तसेच शिमोगा (कर्नाटक) बंदरांकडे पाठविली असल्याचे विश्वसनीय पोलीस सूत्रांनी सांगितले.