सामान्य प्रवाशांची विश्वासार्हता दृढ करणार : रोहन पलंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:00 AM2018-05-11T01:00:56+5:302018-05-11T01:00:56+5:30
प्रवाशांना दर्जेदार सेवा देणे हे आपले कर्तव्य असून, प्रवासी समाधानी राहिले तरच महामंडळाला ऊर्जितावस्थेत येईल. हीच गोष्ट कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मनात रु जविण्यासह सामान्य प्रवाशांची विश्वासार्हता दृढ करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला जाईल, असा विश्वास राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचे नूतन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी व्यक्त केला. महामंडळात सर्वांत कमी वयाचे विभाग नियंत्रक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...
प्रश्न : प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी काही उपक्रम?
उत्तर : प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महामंडळ नेहमीच कटिबद्ध आहे. सुरक्षित व आरामदायी प्रवासासाठी एस.टी.नेच प्रवास करावा. प्रवाशांना सुखरूप पोहोचविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. राज्यातील जवळपास सर्व खेड्यांपर्यंत सेवा देणारी ‘राज्य परिवहन महामंडळ’ ही देशातील एकमेव यंत्रणा आहे. प्रवाशांची वाढती मागणी असलेली अत्याधुनिक ‘शिवशाही’ गाडी विभागाच्यावतीने जास्तीत जास्त मार्गांवर आणण्याचा प्रयत्न केला जाईल. बसेसच्या सेवेची नियमितता, सौजन्यशील वागणूक, स्वच्छता, अपघातविरहित व सुरक्षित सेवेसह प्रवाशांसाठी असलेल्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहोत.
प्रश्न : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना आहेत ?
उत्तर : महामंडळाचा मोठ्या प्रमाणात विस्तारलेला डोलारा हा प्रवाशांची एस. टी.प्रती असलेली आस्था व विश्वासामुळेच टिकून आहे. एस.टी.चा चालक सर्व निकष पूर्ण करूनच महामंडळात रुजू होतो. कर्तव्यावर असणारा चालक हा शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे किंवा नाही याची वेळोवेळी तपासणी करण्यात येते. ४० वर्षांवरील चालकांची दरवर्षी आरोग्य व नेत्रतपासणी केली जाते. मार्गावर तसेच बसस्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महामंडळाच्यावतीने सी.सी.टी.व्ही. यंत्रणा बसविण्यात आली आहे. ज्या ठिकाणी ही यंत्रणा नाही, त्या ठिकाणी लवकरच ती बसविली जाईल.
प्रश्न : कामगारांच्या समस्या सोडविण्याबाबत काही योजना आखल्या आहेत का?
उत्तर : मी स्वत: एस.टी. कर्मचाºयाचा मुलगा आहे. बालपणापासून कर्मचाºयांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आहेत. माझे महाविद्यालयीन शिक्षणही एस.टी.तून प्रवास करून झाले आहे. त्यामुळे येथील प्रत्येक घटकाशी माझे वेगळे नाते आहे. कर्मचाºयांचे काही प्रश्न माझ्या स्तरावर सोडविणे शक्य असतील, तर ते तत्काळ या ठिकाणीच सोडविले जातील. ज्या समस्या वरिष्ठ पातळीवरील आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्वच प्रश्न एकदम हाताळण्यापेक्षा एक-एक प्रश्न मार्गी लावण्यास माझ्याकडून प्राधान्य दिले जाईल.
प्रश्न : ‘गाव तिथे एस.टी.’ ही संकल्पना रुजली आहे का?
उत्तर : महामंडळाच्या स्थापनेच्या उद्दिष्टांमध्येच ‘गाव तिथे एस.टी.’ ही एक मुख्य महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. त्याच संकल्पनेवर आम्ही काम करतो. कोल्हापूर विभागात १२ आगार आहेत. एकूण ९२२ बसेस आहेत. त्यांमध्ये ४१ शिवशाही बसेस (स्वमालकीच्या ०५ व खासगी भाडेतत्त्वावरील ३६) आहेत. सध्या विभागामध्ये एकूण ४८६८ कर्मचारी कार्यरत असून, त्यांमध्ये १६०३, कार्यशाळा कर्मचारी ९६५ आहेत. यांच्यामार्फत एस.टी. जिथपर्यंत जाऊ शकते त्या ठिकाणापर्यंत गाडी पोहोचविली जाईल. प्रवाशांची मागणी, गरज व त्यामधून महामंडळास मिळणारे उत्पन्न या सर्व बाबींचा विचार करून जास्तीत जास्त लोकाभिमुख व सुरक्षित बससेवा पुरविण्याचा आम्ही प्रयत्न केल्याने जिल्ह्यात जवळपास सर्वत्र ही संकल्पना रुजली आहे. काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीमुळे एस.टी. बस जाऊ शकत नाही, त्या वाड्या-वस्ती, गावांच्या जवळपास गाडी नेण्यासाठी प्रयत्नशील आहे.
प्रश्न : कर्मचाºयांची कार्यक्षमता कशी वाढविणार?
उत्तर : एस. टी. महामंडळ हे एक कुटुंब असून, या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे. या कुटुंबातील प्रवासी हा घटक केंद्रबिंदू आहे. प्रत्येक व्यक्तीशी समन्वय ठेवून, प्रवाशांना सोईस्कर व सुरक्षित प्रवास घडविण्यासाठी प्रामुख्याने चालक-वाहक, आगारामधील कर्मचारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जाणार आहेत. फक्त समस्या जाणून न घेता त्या सोडविण्यासाठीही तत्काळ प्रयत्न केले जाणार आहेत. सर्वांना एकत्र घेऊन प्रत्येक कर्मचारी आपल्यातील क्रयशक्ती, आत्मबलाने एस.टी.ला आर्थिक दुष्टचक्रातून बाहेर काढेल, हाच आत्मविश्वास सर्वांच्यामध्ये रुजविण्याचा प्रयत्न आहे.
- प्रदीप शिंदे