Kolhapur: रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर सीएसकेच्या चाहत्याने चिडवले, मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी डोके फोडले
By उद्धव गोडसे | Published: March 28, 2024 03:52 PM2024-03-28T15:52:31+5:302024-03-28T16:04:02+5:30
एकजण गंभीर जखमी, दोघांना अटक
कोपार्डे/ कोल्हापूर : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद सामन्यात रोहित शर्मा बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्याने आनंद व्यक्त केला. या रागातून मुंबईच्या दोन चाहत्यांनी सीएसकेच्या चाहत्यावर जीवघेणा हल्ला केला. हणमंतवाडी (ता. करवीर) येथे बुधवारी (दि. २७) रात्री पावणेदहाच्या सुमारास घडलेल्या घटनेत सीएसकेचे चाहते बंडोपंत बापूसो तिबिले (वय ६३, रा. हणमंतवाडी) हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी बळवंत महादेव झांजगे (वय ५०) आणि सागर सदाशिव झांजगे (वय ३५, दोघे रा. हणमंतवाडी) यांना करवीर पोलिसांनी अटक केले.
करवीरचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री बळवंत झांजगे आणि सागर झांजगे हे इतरांसोबत गल्लीतील एका घरात आयपीएलचा सामना पाहत होते. हे दोघेही मुंबई इंडियन्सने चाहते असून, हैदराबाद संघाने धावांचा डोंगर उभा केल्याने ते रागात होते. रोहित शर्मा बाद होताच चेन्नई सुपर किंग्जचे चाहते बंडोपंत तिबिले तिथे पोहोचले. 'रोहित शर्मा गेला. आता मुंबई कशी जिंकणार?' असे म्हणत ते चेन्नई संघाचे कौतुक करू लागले.
याचा राग आल्याने बळवंत झांजगे यांनी तिबिले यांच्या डोक्यात काठीने मारहाण केली. त्याचवेळी सागर याने डोक्यात फळी घातल्याने तिबिले जागीच बेशुद्ध पडले. खासगी रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
याबाबत जखमी बळवंत तिबिले यांचे भाऊ संजय बापूसो तिबिले (वय ४८) यांनी करवीर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान किरकोळ कारणावरून दोन संघांच्या चाहत्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेने पोलिसही चक्रावले. पोलिस उपनिरीक्षक युनुस इनामदार अधिक तपास करीत आहेत.
क्षुल्लक कारणातून आयुष्य उद्ध्वस्त
क्षणिक राग आणि भावनेच्या आवेगात वाहून गेल्याने क्षुल्लक कारणातून बंडोपंत तिबिले आज मरणाच्या दारात आहेत. इतरवेळी गुण्यागोविंदाने राहणारे सख्खे शेजारी आयपीएलमधील दोन संघाच्या चुरशीने भिडले. यातून घडलेल्या दुर्घटनेमुळे तिघांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे.