रोहित्र दुरुस्तीचे काम पूर्ण, आजपासून वीज सुरळीत
By admin | Published: April 30, 2017 01:14 AM2017-04-30T01:14:45+5:302017-04-30T01:14:45+5:30
युद्धपातळीवर काम; महापारेषण, महावितरणचा समन्वय
कोल्हापूर : महापारेषण कंपनीच्या तळंदगे येथील ४०० के.व्ही. उपकेंद्रातील ५०० एम.व्ही.ए. क्षमतेचे अतिउच्चदाबाचे रोहित्र नादुरुस्त झाल्याने त्याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यात कृषी विभागाला बसला; पण महापारेषणने युद्धपातळीवर काम करून शनिवारी रात्री उशिरापर्यंत हे दुरुस्तीचे काम पूर्ण केले. नियोजबद्धरीत्या भारनियमनाचे प्रकरण हाताळल्याने ग्राहकांनाही फारसा त्रास झाला नाही. आज, रविवारी पहाटेनंतर या दुरुस्त केलेल्या रोहित्रावर हळूहळू भार वाढवून ते पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
महापारेषण कंपनीच्या तळंदगे (ता. हातकणंगले) येथील ४०० के.व्ही. अतिउच्चदाब उपकेंद्रातून जिल्ह्णाला वीजपुरवठा असून सध्या विजेची मागणी ११०० मेगावॅट आहे. त्यानुसार तळंदगे उपकेंद्रात ५०० एमव्हीए क्षमतेचा एक व ३१५ एमव्हीए क्षमतेचे दोन असे एकूण ११३० एमव्हीए क्षमतेची तीन अत्युच्च दाबाची रोहित्रे आहेत; पण बुधवारी (दि. ३६) ५०० एमव्हीए क्षमतेच्या अतिउच्चदाब रोहित्रात अचानक बिघाड झाला. हे रोहित्र बदलण्याचे काम अवघड व जोखमीचे असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किमान आठ दिवस लागणार होते.
पण महापारेषणने महावितरणच्या मदतीने हे काम तीन दिवसांत शनिवारी रात्री उशिरा पूर्ण झाले. त्याची रात्रीपासून पहाटेपर्यंत चाचणीही घेतली. घटनास्थळी महापारेषणचे संचालक (संचालन) ओमप्रकाश एम्पाल, मुख्य अभियंता सुरेशकुमार पाटील, अधीक्षक अभियंता एस. एस. कुंभार, कार्यकारी अभियंता ए. सी. ढमाले, कार्यकारी अभियंता आर. एम. देव, ‘महावितरण’चे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे, थांबून कार्यरत होते.
वीज देणे बंद
हे रोहित्र दुरुस्ती होईपर्यंत जिल्ह्णातील विविध विभागांतील भारनियमन विभागून वीजपुरवठा करण्यात आला. विजेची मागणी मोठी असल्याने या कालावधीत गोवा, कर्नाटक राज्यांना देण्यात येणारी वीज बंद करून ती कोल्हापूरला वळवली होती.
जिल्ह्णात विजेची मागणी असल्यामुळे परराज्यांत दिली जाणारी वीज जिल्ह्णात वळविली होती. त्यातून भारनियमन कमी करण्यात यश आले आहे. शनिवारी रात्री उशिरा काम पूर्ण झाले असून आज, रविवार दुपारपासून या बदलेल्या रोहित्रामधून पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्यात येईल.
- ए. सी. ढमाले, कार्यकारी अभियंता, महापारेषण कंपनी
शेतीसाठी भारनियमन
गेले चार दिवस हे रोहित्र बदलण्याचे जोखमीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. त्यासाठी जिल्ह्णातील शेती पंपांसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता दोन तास भारनियमन केले. ती वेळ पुढे वाढवून दिली. तसेच काही प्रमाणात गावठाणातही भारनियमन करावे लागले होते. ही परिस्थिती अगोदरच जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्राहक सावध झाले होते. त्यामुळे त्याचा फटका बसला नाही.