‘भोगावती शिक्षण’साठी चरापलेंची भूमिका महत्त्वाची
By admin | Published: July 27, 2016 12:16 AM2016-07-27T00:16:35+5:302016-07-27T00:30:13+5:30
सतेज पाटील यांना साथ : साखर कारखान्यातील नोकरभरती, सभासदवाढीचा मुद्दा ऐरणीवर आणला
बाजीराव फराकटे -- शिरगाव भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक मागे-पुढे होण्यासाठी सत्तारूढ तसेच विरोधातील शिवसेना प्रयत्न करीत आहे. तरीही निवडणूक झालीच, तर या निवडणुकीत काँग्रेसचे नेते, भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांच्या भूमिकेला महत्त्व येणार आहे. ते कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकतात यावर बऱ्याच घडामोडी अवलंबून आहेत.
एकेकाळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांचे विश्वासू सहकारी असणारे चरापले हे आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर होते. यातून पाटील व चरापले यांच्यातील दरी वाढत गेली. दूध संघाच्या उमेदवारीतही चरापले यांना सलग दुसऱ्यांदा डावलले गेल्याने त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी उघड - उघड पी. एन., महादेवराव महाडिक पॅनेलला विरोध करून सतेज पाटील यांच्या पॅनेलला पाठिंबा दिला. इतकेच नव्हे, तर राधानगरी व भोगावती परिसरातील सर्व जबाबदारी चरापले यांच्या खांद्यावरच दिली होती. चरापले यांनीही विरोधी पॅनेलच्या विजयासाठी कष्ट घेतले होते. पण, यात सत्तारुढांनीच बाजी मारली.
या दरम्यान ‘भोगावती’च्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. भोगावती साखर कारखान्याची नोकरभरती, सभासद वाढीचा मुद्दा घेऊन चरापले यांनी कोर्टकचेऱ्या केल्या. काँग्रेसच्याही नेतेमंडळीनीसुद्धा कारखान्याची निवडणूक अथवा प्रशासक येण्यासाठी जिवाचे रान केले. सहा वर्षानंतर कारखान्यावर प्रशासक आले. ही लढाई चरापले यांच्यासह काँग्रेसच्या नेतेमंडळींनी जिंकली असली तरी खरी लढाई ही आता होणार आहे. कारण भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची निवडणूक लागली आहे. या मंडळावर एकेकाळी चरापले यांना आपले दुसरे नेते मानणारे प्रा. ए. डी. चौगले हे या संख्येचे चेअरमन झाले. सात-साडेसात वर्षांपूर्वी या संस्थेची निवडणूक झाली होती. यामध्ये न्यायालयीन लढाई लढली याचे बक्षीस म्हणून चौगले यांना चेअरमनपदाची लॉटरी लागली तर व्हा. चेअरमनपद राष्ट्रवादीच्या नामदेवराव पाटील यांना मिळाले.
पण, आता महत्त्वाचा भाग आहे तो निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सत्तारुढ संचालकांनी आपले राजीनामे साखर कारखाना नियुक्त चेअरमन जयसिंगराव हुजरे यांच्याकडे दिले आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संचालकांचा समावेश आहे. तर शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांना मानणाऱ्या तीन संचालकांनी काहीही करून निवडणूक लावण्याचे ठरविले आहे. यासाठी दोन्ही गट आज न्यायालयात आमने-सामने आले होते. यांची तारीख २८ जुलै पडली आहे. यावेळी जर निवडणूक लागलीच तर चरापले यांच्या भूमिकेला फार महत्त्व आहे. चरापले यांना सोबत घ्यावे का, अशी भूमिका माजी आमदार पी. एन. पाटील यांची असणार का हा महत्त्वाचा भाग आहे. जर राष्ट्रवादी-काँग्रेससह एकत्र पॅनेल झाले, तर मात्र गेली सहा वर्षे भोगावती साखर कारखान्याच्या कारभारावरून सत्तारूढ राष्ट्रवादी-शेकाप युतीला या ना त्या कारणाने जेरीस आणणारे नेते व स्थानिक कार्यकर्त्यांना ही युती रुचेल काय? हा प्रश्न आहे.
चरापलेंच्या पाठिंब्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न
भोगावती परिसरातील चरापले यांना मानणारे कार्यकर्ते आहेत. ते पर्यायाने काँग्रेसचे असले तरीही चरापले यांचा शब्द प्रमाण मानतात. त्यामुळे शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीत त्यांच्या भूमिकेला मोठे महत्त्व येणार आहे. काँग्रेसची नेतेमंडळी त्यांना आपल्याकडे ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील. पण, भविष्यात काय होईल, हेही सांगता येत नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत तरी चरापले हे या निवडणुकीत ‘किंगमेकर’ ठरतील.