...तर टोकाची भूमिका : राजू शेट्टी
By admin | Published: October 8, 2015 01:02 AM2015-10-08T01:02:29+5:302015-10-08T01:04:21+5:30
याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत कारखानदारांना परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले.
कोल्हापूर : एकरकमी ‘एफआरपी’ देणे कायद्याने बंधनकारक असताना साखर कारखानदार त्याचे तुकडे पाडणार असतील, तर ते खपवून घेणार नाही. एकंदरीत गेल्या सहा-सात महिन्यांतील सरकारची भूमिका पाहिली तर कारखानदारांना पाठीशी घालणारी आहे, असाच संशय येतो. अशीच भूमिका घेणार असाल तर आम्हालाही टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सत्तेपेक्षा शेतकऱ्यांचे हित महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. साखर कारखान्यांनी टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला शेतकरी संघटनांनी विरोध केला असून, त्याविरोधात १६ आॅक्टोबरला ‘स्वाभिमानी’ने प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चाचे नियोजन केले आहे. याबाबत खासदार राजू शेट्टींशी संपर्क साधला असता ते म्हणाले, साखर कारखान्यांच्या सर्वसाधारण सभेत कारखानदारांनी टप्प्याटप्प्याने ‘एफआरपी’ देण्याचा ठराव करून घेतला आहे.
याबाबत आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यांनी याबाबत कारखानदारांना परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, एकंदरीत गेल्या पाच-सहा महिन्यांतील सरकारची भूमिका पाहता त्यांचीही कारखानदारांच्या भूमिकेला मूक संमती असल्याचे दिसते. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून कारखानदारांना सरकार पाठीशी घालणार असेल तर आम्हाला टोकाची भूमिका घ्यावी लागेल. सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही, सरकारमध्ये असलो काय आणि नसलो काय? आमच्या दृष्टीने शेतकरी महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्यांच्या हितापुढे कधीही तडजोड केली नाही आणि करणारही नाही. याचे भान कारखानदार व सरकारनेही ठेवावे, असा इशारा शेट्टी यांनी दिला. (प्रतिनिधी)
५० हजार शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम
शेतकऱ्यांनी सर्वसाधारण सभेत मान्यता दिली असेल तर संघटनेला काय हरकत, अशी भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. यासाठी आम्हीही गावोगावी शेतकऱ्यांना भेटून ‘एफआरपी’बाबत भूमिका जाणून घेण्याची मोहीम उघडली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे नाव, साखर कारखान्यांचे नाव, सभासद, ऊस उत्पादक, अशी सर्व माहिती घेण्यात येणार असून, तुम्हाला एकरकमी ‘एफआरपी’ पाहिजे की टप्प्याटप्प्याने, असेही विचारले जाणार आहे. जिल्ह्यातून ५० हजार शेतकऱ्यांच्या सह्यांची मोहीम घेतली असून, यासह प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.