जनसुराज्य पक्षाची भूमिका गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:19 AM2020-12-26T04:19:49+5:302020-12-26T04:19:49+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक लढवावी की नको यासंदर्भात जनसुराज्य शक्ती पक्षाचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, त्यांच्या भूमिकेकडे शहरातील ...
कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक लढवावी की नको यासंदर्भात जनसुराज्य शक्ती पक्षाचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, त्यांच्या भूमिकेकडे शहरातील राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
जनसुराज्य शक्ती पक्षाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बरोबर आघाडी करून महानगरपालिकेची २००५ सालातील निवडणूक लढविली होती, परंतु आठ जागांपेक्षा अधिक जागा जिंकता आल्या नाहीत. पुढे सव्वा वर्षाने सत्तारूढ ताराराणी आघाडीला छेद देऊन त्यांच्या नगरसेवकांचा एक गट फोडला होता. त्यानंतर जनसुराज्य व राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता महापालिकेत आली. महापालिकेचे पदाधिकारी वारणेतून ठरायला लागले होते.
पक्षाचे प्रमुख विनय कोरे त्यावेळी राज्याचे कॅबिनेट मंत्री असल्याने त्यांनी महापालिकेची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न केला. पुढे २०१० मध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी झाली व जनसुराज्य शक्ती पक्ष मागे पडला. त्यानंतर मात्र महापालिकेत त्यांना फारसे यश आले नाही. महापालिका, जिल्हा बँक, जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीसोबत राहून राजकीय भागीदारी करणारा हा राजकीय पक्ष सत्तेत सक्रिय राहिला नाही.
सध्या हा पक्ष राज्यातल्या राजकारणात भाजपबरोबर आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीसोबत आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक लढवायची की नाही या संभ्रमात पक्षाचे नेते व कार्यकर्ते आहेत. निवडणूक लढविण्यावर त्यांनी अद्याप चर्चा केलेली नाही. मात्र, लवकरच त्यांची भूमिका स्पष्ट केली जाईल, असे सांगण्यात येते.