जयंत पाटील यांची भूमिका ठरली महत्त्वाची
By admin | Published: November 14, 2015 12:57 AM2015-11-14T00:57:49+5:302015-11-14T01:16:03+5:30
स्वीकृतसाठी दरवाजे खुले : महापालिकेच्या घडामोडींबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा
कोल्हापूर : महानगरपालिकेतील सत्तासंघर्ष टोकाला जाऊ नये आणि त्यातून काही वेगळे चित्र निर्माण होऊन राजकीय पक्षांची बदनामी होऊ नये म्हणून नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी बुधवारी (दि. ११) रात्री उशिरा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत भाजपचाच महापौर करण्याच्या आग्रहापासून पालकमंत्री पाटील यांना दूर करण्यात त्यांना यश आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान यामुळे प्रा. जयंत पाटील यांचा स्वीकृत नगरसेवक होण्याचा मार्ग मोकळा झाला.
बुधवारी रात्री दहा ते साडेअकरा वाजता या वेळेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरी जाऊन नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी महापौर निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. चर्चेत प्रा. पाटील यांनी बऱ्याच विस्ताराने खुलासेही केले. घोडेबाजार केला तर भाजप व राष्ट्रवादीची बदनामी होईल; ते पुढची काही वर्षे डोकेदुखी ठरेल. तुम्ही राष्ट्रवादीतील कांही सदस्यांना फोडायचा प्रयत्न केल्यास ताराराणी आघाडीतही अंतर्गत नाराजी आहे असेही त्यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. भाजप-ताराराणी आघाडीसोबत असलेली काही माणसे ही राष्ट्रवादीला विश्वासार्ह वाटत नाहीत. म्हणूनच राष्ट्रवादीचा त्यांच्याबाबत आक्षेप आहे. भाजप आणि व्यक्तिगत पातळीवरही अशा प्रकारचे राजकारण करणारा नेता अशी तुमची प्रतिमा नाही. त्यामुळे ताराराणीतील एक-दोन कारभाऱ्यांच्या आग्रहाला बळी पडून कांही वेगळे घडविण्याच्या फंदात पडू नका. त्यात तुम्ही फसले जाण्याची अधिक शक्यता आहे. म्हणूनच कोणत्याही हालचाली न करता संयम राखावा, अशी भूमिका प्रा.पाटील यांनी चर्चेवेळी मांडली.
पालकमंत्र्यांसोबत प्रा. पाटील बोलणी करण्यास जातात याचा अर्थ या सगळ्या घटनांना आमदार हसन मुश्रीफ यांची संमती असण्याची शक्यता आहे. कदाचित कॉँग्रेस-भाजपला विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुखवायचे नसेल असे या चर्चेवरून दिसते. मात्र, दोन पाटलांमधील या चर्चेनंतर भाजपने महापौर करण्याचा आग्रह सोडून देत फक्त निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)
असेही राजकारण..
दादांनी आपण विरोधी पक्षांत बसणार अशी जाहीर भूमिका न घेता तसे वृत्तपत्रांना फक्त निवेदन पाठवून द्यावे, असा आग्रह ताराराणी आघाडीतील काही म्होरक्यांचा होता. परंतु दादा त्यास तयार झाले नाहीत. पत्रकार परिषद घेण्यावर ते ठाम राहिले. मग पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांच्यामुळे हे झाले, असे दादांनी सांगू नये, असेही सूचित करण्यात आल्याचे समजते.